परवानगी नसताना सुरू ठेवली विज्ञान शाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:37 PM2018-01-23T23:37:14+5:302018-01-23T23:37:27+5:30
येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी यंदा श्री स्वामी विद्यालय व अंजनाबाई पारधी कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव या शाळेमधून परीक्षेस बसणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना टी.सी. सुध्दा डोंगरगाव शाळेमधूनच मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी-डाकराम : येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी यंदा श्री स्वामी विद्यालय व अंजनाबाई पारधी कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव या शाळेमधून परीक्षेस बसणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना टी.सी. सुध्दा डोंगरगाव शाळेमधूनच मिळणार आहे. ही आश्चर्यचकीत करणारी बाब असून यासाठी प्रभारी प्राचार्य यू.बी. पारधी कारणीभूत असल्याचे बोलले जाते.
सुकडी-डाकराम येथील जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी व बारावीच्या कला शाखेला शासनाची मान्यता आहे. पण विज्ञान शाखा सुरु केली तेव्हा विज्ञान शाखेला शासनाची कोणत्याच प्रकारची मान्यता नव्हती. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.
सदर विज्ञान शाखेची तुकडी स्थानिक जि.प. शाळेमध्ये सुरु करण्यात आली. तशा प्रकारचा प्रस्ताव तत्कालीन प्राचार्य ए.झेड. नंदेश्वर यांनी जि.प. गोंदियाच्या शिक्षण विभागाला पाठविला होता. त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर प्रभारी प्राचार्य यू.बी. पारधी यांनी पदभार सांभाळला. पण त्यांनी जि.प. गोंदियाकडे कोणतीच विचारपूस किंवा पाठपुरावा न केल्यामुळे तो प्रस्ताव जि.प. शिक्षण विभागात पडून राहिला.
दरम्यान अकरावीनंतर बारावी विज्ञान शाखेचे वर्ग सुरु झाले. दोन वर्ष लोटून सुध्दा विज्ञान शाखेची परवानगी मिळाली नव्हती. ही बाब प्रभारी प्राचार्य यू.बी. पारधी यांना माहीत होती. पण काहीतरी करून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नागपूर बोर्डात जावून विचारपूस केली.
त्यावेळी बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे नुकसान न करता तुम्ही जवळच्या शाळेच्या नावाने विद्यार्थी परीक्षेला बसवा, असा सल्ला देण्यात आला. तेव्हा शिक्षण उपसंचालक नागपूर व शिक्षण संचालक पुणे यांना पत्र व्यवहार करुन बारावी विज्ञान शाखेच्या मुलांना तात्पुरती परीक्षा देण्यासाठी मंजुरी देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या नुकसानीसाठी प्रभारी प्राचार्य जवाबदार असल्याचा आरोप आहे. शाळेमध्ये गटबाजी करणे, मी करेन तो कायदा अशा भूमिकेतून वावरणारे प्रभारी प्राचार्य पारधी यांच्या धोरणामुळे सुकडी-डाकराम येथील विद्यार्थ्यांना डोंगरगाव शाळेच्या नावाने परीक्षा देण्याची वेळ आल्याचा आरोप आहे.
बारावीच्या परीक्षा केंद्रासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास मेश्राम, पत्रकार जांभूळकर व प्राचार्य ए.झेड. नंदेश्वर, प्रा.एस.ए. कापगते यांनी मेहनत घेतली. मात्र आता या शाळेला विज्ञान शाखेची परवानगी नसल्यामुळे विज्ञान शाखेचे विद्यार्थ्यांना डोंगरगाव शाळेच्या नावाने परीक्षा बसण्याची वेळ आली आहे.