या देशात पूर्वीपासूनच विज्ञानाची सुरुवात
By admin | Published: August 23, 2014 01:55 AM2014-08-23T01:55:56+5:302014-08-23T01:55:56+5:30
जगात विलोभनीय दर्शन करायचे असेल तर ते भारत देशात होऊ शकेल. या देशात पूर्वीपासून विज्ञानाची सुरुवात झाली.
सालेकसा : जगात विलोभनीय दर्शन करायचे असेल तर ते भारत देशात होऊ शकेल. या देशात पूर्वीपासून विज्ञानाची सुरुवात झाली. महाभारतात टेस्ट ट्यूब बेबीची संकल्पना, रामायणात हनुमान म्हणजे स्पायडर मॅन, आयुर्वेदाची निर्मिती फार जूनी असून याची निर्मिती फार पूर्वीपासून झाली आहे. महाभारतात संजय ने धृतराष्ट्राला महाभारताचे युद्ध ‘लाईव्ह टेलिकास्ट’ सांगितले होते. हा विज्ञान पूर्वीच्या काळातही होता. म्हणून विज्ञान म्हटलं की ज्ञान आले आणि ज्ञान म्हटले की आध्यात्म आले, असे प्रतिपादन देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांनी देवरी येथे केले.
ते एनसीआरटी नई दिल्ली, राष्ट्रीय विज्ञान शिक्षण संस्था नागपूर तथा शिक्षण विभाग जि.प. गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने देवरी येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलनात आयोजित तृतीय जिल्हास्तरीय इन्स्पायर अॅवार्ड विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण व समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरीचे उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाने होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलनाचे संस्था सचिव झामसिंग येरणे, गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य महेंद्र मेश्राम, सेवानिवृत्त वनक्षेत्र सहायक दहीवले, छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज भूरे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य लाडे, प्राचार्य मनीष लोंढेसह अनेक मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष दुर्वेश सोनवाने म्हणाले की, विज्ञानाला सर्वांचे मन १०० टक्के मान्य करतात. आपल्याला जीवन चांगल्याप्रकारे जगण्याकरिता विज्ञान हवे आहे. आपल्या जीवनातून विज्ञानाला काढून बघा, तर असा जीवन आपल्याला तुच्छ वाटल्या शिवाय राहणार नाही. एक तत्व विद्यार्थ्यांनी मनात बसवून ठेवावे की निसर्गाने जे पंचतत्व पुरवले आहे ते मी नष्ट करू शकत नाही. याचे उत्पन्न आपण करू शकत नाही. तर रुपांतर घटकांचा वापर करून एक विशिष्ट वस्तू बनवू शकतो आणि ती वस्तू उपयोगात आणली की ते एक विज्ञान आहे. अशा शब्दात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या तीन दिवसीय इन्स्पाअर अॅवार्ड विज्ञान प्रदर्शनात एकूूण २७० विद्यार्थ्यांनी आपले विज्ञानाचे प्रयोग सादर केले. यामधून २० विज्ञान प्रयोगांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन पुणेकरिता निवड करण्यात आली आहे. हे २० विज्ञान प्रयोग सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शिल्ड व प्रमाणपत्र हे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोंदिया जि.प.चे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एस.बी. खंडागळे यांनी तर संचालन छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलनाचे शिक्षक एस.टी. मेश्राम यांनी केले. आभार गोंदिया जि.प.चे शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे यांंनी मानले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील २७० शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. वंदेमातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.