मूर्तिकारांचे झाले आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 09:15 PM2019-07-14T21:15:45+5:302019-07-14T21:16:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : येत्या २३ आॅगस्टपासून हिंदू धर्मीयांच्या मूर्ती पूजनाच्या सणांना सुरूवात होत असल्याने मूर्तिकारांचे शहरात आगमन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येत्या २३ आॅगस्टपासून हिंदू धर्मीयांच्या मूर्ती पूजनाच्या सणांना सुरूवात होत असल्याने मूर्तिकारांचे शहरात आगमन झाले आहे. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी मुर्तिकार आपले बस्तान मांडतात. त्यानुसार यंदाही त्यांचे आगमन झाले असून त्यांनी आतापासूनच मूर्ती बनविण्यास सुरूवात केल्याचेही दिसून येत आहे.
कुंभारांचा परिसर व मुर्तिंसाठी नागपूरची ‘चितारओळ’ प्रसिद्ध आहे. नागपूरवासी मूर्तिंची तेथूनच खरेदी करतात. असाच काही नजारा आता येथील सिव्हील लाईन्स परिसरात बघावयास मिळतो. सिव्हील लाईन्स परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मूर्तिकार येत असून यंदाही मूर्तिकारांचे आगमन होत असल्याचे दिसत आहे.
हनुमान चौकपासून या मूर्तिकारांचे परिवार आपले बस्तान मांडून मूर्ती तयार करतात. त्यानुसार यंदाही मूर्तिकारांचे परिवार आपापल्या ठिकाणांवर आले असून त्यांचे काम सुरू झाले आहे.
हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजनासाह मूर्तिपूजेलाही तेवढाच मान आहे. यंदा २३ आॅगस्ट रोजी जन्माष्टमी असून त्यापासून मूर्तिपूजनाचे सण सुरू होत आहेत.
२ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना येत असून त्यानंतर नवरात्री, शारदा, भुलाभाई, लक्ष्मीपूजन सारखे सण येतील. त्यामुळे हे मूर्तिकार आतापासूनच गोंदियात आले असून त्यांनी मूर्ती बनविण्यास सुरूवात केली असल्याचेही दिसत आहे. मोठ्या संख्येत मूर्तिकार सिव्हील लाईन्स परिसरात येत असून हनुमान चौक ते इंगळे चौक हा परिसर जणू ‘चितारओळ’ म्हणूनच प्रसिद्ध झाला आहे.
शिवाय इंगळे चौक पुढील परिसरातही काही मूर्तिकार येत असून व्यवसाय करतात. आता सध्या तरी काही परिवारांचे आगमन झाल्याचे दिसून येत आहे.
मात्र अन्य मूर्तिकारांनी ते नेहमी राहत असलेल्या जागांच्या मालकांची भेट घेतली असून लवकरच ते राहण्यासाठी येतील. आपल्या घरात मूर्तिकारांच्या हातून साक्षात देवच घडत असल्याने घरमालकही खुशी-खुशी मूर्तिकारांना आपले घर किंवा जागा देतात.
कोलकाता येथील मूर्तिकारांचेही आगमन
येथील सिव्हील लाईन्स परिसरात लगतच्या गावांतील मूर्तिकार येत असून आपला व्यवसाय करून निघून जातात. मागील काही वर्षांपासून मात्र त्यांच्यासोबतच लगतच्या छत्तीसगड राज्यातील व चंद्रपूर येथीलही काही मूर्तिकार गोंदियात येवू लागले आहे. विशेष म्हणजे, कोलकाता येथील बंगाली मूर्तिकारही दुर्गा, शारदा व कालीमातेच्या मूर्ती बनविण्यासाठी येतात. त्यामुळे गोंदियाचा सिव्हील लाईन्स परिसर चांगलाच गजबजू लागतो.
कान्होबाच्या मूर्तींचीही तयारी
मूर्तिपूजनाच्या सणांत सर्वप्रथम जन्माष्टमी येते व त्यानंतरच अन्य मूर्तिपूजनाचे सण येतात. येत्या २३ आॅगस्ट रोजी जन्माष्टमी येत असल्याने मूर्तिकार कामाला लागले आहेत. कान्होबा कमीच घरात बसत असल्याने त्यांची संख्या कमी आहे. मात्र गणपतीचे आॅर्डर जास्त राहत असल्याने मूर्तिकार गणरायाच्या मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. तर सोबतच कान्होबाच्या मूर्तिंचीही त्यांची तयारी आहे.