रिलायन्स कंपनीच्या टॉवरला ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:27 AM2021-02-12T04:27:30+5:302021-02-12T04:27:30+5:30
गोंदिया : मालमत्ता कर थकबाकी वसुलीअंतर्गत नगर परिषदेच्या कर वसुली पथकाने गुरुवारी (दि.११) शहरातील प्रताप क्लब स्थित रिलायन्स कम्युनिकेशन ...
गोंदिया : मालमत्ता कर थकबाकी वसुलीअंतर्गत नगर परिषदेच्या कर वसुली पथकाने गुरुवारी (दि.११) शहरातील प्रताप क्लब स्थित रिलायन्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या टॉवरला सील ठोकले. या कंपनीकडे सन २०१८-१९ पासून तीन लाख २३ हजार २३१ रुपयांची थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली.
कर वसुली पथकाकडून यंदा मालमत्ता कर वसुली करताना सक्ती पाळली जात आहे. राजकारण व दबाब बाजूला सारून कर वसुली पथक वसुली करीत असून कराचा भरणा न करणाऱ्यांवर थेट कारवाई करीत आहे. यातूनच आतापर्यंत कित्येक मालमत्तांना सील ठोकण्यात आले आहे. गुरुवारी (दि.११) पथकाने उपमुख्याधिकारी व कर अधिकारी विशाल बनकर यांच्यासोबत शहरातील प्रताप क्लब स्थित रिलायन्स कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या टॉवरवर धडक दिली. मात्र, कंपनीकडून कराचा भरणा करण्यास असमर्थता दाखविण्यात आल्याने पथकाने टॉवरला सील ठोकले.
-------
कंपनीच्या आणखी ४ टॉवरवर होणार कारवाई
कर वसुली पथकाने गुरुवारी प्रताप क्लब येथील टॉवरला सील ठोकले आहे. मात्र, कंपनीचे एकूण ५ टॉवर असून आता ४ टॉवर उरले आहेत. अशात आता पथक शुक्रवारी उर्वरित ४ टॉवरवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता हे ४ टॉवर सील होतात की, कराचा भरणा केला जातो, यावरच सर्व काही अवलंबून आहे.