बाजारातील ३ दुकानांना ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:28 AM2021-02-13T04:28:15+5:302021-02-13T04:28:15+5:30
गोंदिया : मालमत्ता कर वसुलीच्या मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या करवसुली पथकाने शहरातील गंज बाजारातील ३ दुकानांना शुक्रवारी (दि.१२) सील ठोकले. ...
गोंदिया : मालमत्ता कर वसुलीच्या मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या करवसुली पथकाने शहरातील गंज बाजारातील ३ दुकानांना शुक्रवारी (दि.१२) सील ठोकले. या दुकानधारकावर सुमारे एक लाख रुपयांची थकबाकी होती. मात्र, पथकाने दुकानांना सील ठोकताच दुकानधारकाने कराचा भरणा केल्याने ती दुकाने उघडण्यात आली.
नगर परिषद कर विभागाकडून यंदा करवसुलीसाठी जोमात मोहीम राबविली जात आहे. विशेष म्हणजे, मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्याचा सपाटाच करवसुली पथकाने यंदा केला आहे. यातूनच आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. परिणामी, नगर परिषदेची मालमत्ता करवसुलीही चांगलीच होत आहेत. करवसुली मोहिमेंतर्गत पथकाकडून सध्या दररोज थकबाकीदार मालमत्ताधारकांना सीलिंगचा दणका दिला जात आहे. या अंतर्गत, शुक्रवारी (दि.१२) उपमुख्याधिकारी तथा कर अधिकारी विशाल बनकर यांच्यासह पथकाने गंज बाजारात प्रदीप आहुजा यांच्या नावावर असलेल्या ३ दुकानांना सील ठोकले. आहुजा यांच्यावर सुमारे एक लाख रुपयांच्या मालमत्ता कराची थकबाकी असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. मात्र, सीलिंगच्या कारवाईचा धसका घेत आहुजा यांनी त्यांच्याकडील थकबाकीचा भरणा केल्याने त्यांच्या दुकानांचे सील उघडून देण्यात आले.