पुन्हा दोन दुकाने केली सील ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:31 AM2021-02-11T04:31:40+5:302021-02-11T04:31:40+5:30
गोंदिया : नगर परिषदेने थकीत मालमत्ता करवसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते यंदा प्रथमच नगर ...
गोंदिया : नगर परिषदेने थकीत मालमत्ता करवसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते यंदा प्रथमच नगर परिषदेच्या तिजोरीत सातत्याने खणखणाट होत आहे. बुधवारी नगर परिषदेच्या मालमत्ता करवसुली पथकाने शहरातील दोन दुकाने सील करण्याची कारवाई केली. त्यामुळे थकीत मालमत्ता करधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
शहरातील शिवाजी वॉर्डातील मीताराम जग्गनाथ छपरिया व प्रकाशचंद जग्गनाथ छपरिया यांच्याकडे सन २००६ पासून मालमत्ता करापोटी १ लाख ३६ हजार १९६ रुपये थकीत होते. त्यांनी मालमत्ता कराचा भरणा न केल्याने नगर परिषदेच्या मालमत्ता कर वसुली पथकाने त्यांची चार दुकाने सील केली, तर दिलबाग गांधी यांचे दुकानेसुध्दा सील करण्यात आले होते. मात्र, त्यांनी वेळीच मालमत्ता कराचा भरणा केल्याने त्यांचे दुकान उघडण्यात आल्याची माहिती नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली. नगर परिषदेने यंदा ८० टक्के मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठीच ही धडक जप्ती मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत नगर परिषदेने ४५ टक्के मालमत्ता कर वसूल केला असून, अजून दीड महिना शिल्लक आहेे. त्यात हे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. नगर परिषदेची यंदा ८० टक्के मालमत्ता कर वसुली झाल्यास हा गोंदिया नगर परिषदेचा इतिहास होणार आहे. मालमत्ता कर वसुलीमुळे नगर परिषदेला मिळणाऱ्या अनुदानातसुध्दा वाढ होण्याची शक्यता असून, शहराच्या विकासालाही गती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.