हत्तीरोगाची रात्रीला शोध मोहीम
By Admin | Published: October 11, 2015 01:00 AM2015-10-11T01:00:31+5:302015-10-11T01:00:31+5:30
सद्य स्थितीत जिल्ह्यातील मोजक्या ठिकाणी हत्ती पायाच्या रुग्णांची शोधमोहीम रात्रीला करण्यात येत आहे.
नागपूरची चमू जिल्ह्यात दाखल : चमूत पाच सदस्यांचा समावेश
गोंदिया : सद्य स्थितीत जिल्ह्यातील मोजक्या ठिकाणी हत्ती पायाच्या रुग्णांची शोधमोहीम रात्रीला करण्यात येत आहे. यासाठी नागपूर येथून आलेली एक चमू मागील अनेक दिवसांपासून या रुग्णांची शोधमोहीम राबवित आहे.
हत्तीरोगाचे किटाणू रात्रीला दिसतात त्यामुळे त्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी रात्रीचा वेळ ठरविला जातो. रात्रीच्या वेळी निश्चित ठिकाणी जाऊन रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेतले जातात. नागपूर येथून आलेली चमू २५ सप्टेंबरपासून १० आॅक्टोबरपर्यंत रक्ताचे नमुने गोळा करण्याचे काम करीत आहे. नागपूर विभागाच्या कोणत्याही एका जिल्ह्यात ही चमू सदर अभियान चालवितो. यावर्षी गोंदिया जिल्ह्यात सदर अभियान चालविण्यात येत आहे. गोंदिया शहरातील बाजपेयी वॉर्ड, लोधीटोला (ढाकणी) व डोंगरगाव आरोग्य केंद्रांतर्गत येणारा खर्रा, केवूटोला, ओझीटोला, नागरा येथील कटंगटोला व चांदणीटोला यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त काही रेंडमसाईड्स निश्चित करण्यात आले आहेत. यात खैरबोडी, तिरोडाचा आंबेडकर वॉर्ड, गोंदिया तालुक्यातील आसोली व अर्जुनी मोरगाव तालुक्याचा कोरंभी येथेही सदर अभियान राबविला जात आहे. मागच्यावर्षी रेन्डम साईड्स म्हणून रतनारा, चिचगाव, तिरोडाचा भूतनाथ वॉर्ड व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी या गावाची निवड करण्यात आली होती. दरवर्षी रेन्डम साईड्समध्ये गाव बदलतात. हत्तीपायाचे रुग्ण असल्याची अधिक शक्यता असलेल्या गावांची निवड केली जाते. (तालुका प्रतिनिधी)