Corona Virus in Gondia; गोंदियातील कोरोनाबाधित युवकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 08:36 PM2020-03-30T20:36:50+5:302020-03-30T20:40:01+5:30

शहरातील गणेशनगर परिसरातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले.त्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी सदर युवकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.

The search for those who came in contact with the Corona positive youth in Gondia started | Corona Virus in Gondia; गोंदियातील कोरोनाबाधित युवकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू

Corona Virus in Gondia; गोंदियातील कोरोनाबाधित युवकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू

Next
ठळक मुद्देचार जणांचे रिपोर्ट निगेटिव्हखबरदारीच्या उपाय योजना सुरू


लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गणेशनगर परिसरातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले.त्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी सदर युवकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून आत्तापर्यंत युवकाच्या संपर्कात आलेल्या एकूण १४ जणांना आयुवैदिक महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गोंदिया येथे २७ मार्च रोजी आढळला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने सदर रुग्णाला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करुन घेतले. तर त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्य व संपर्कात आलेल्या ९ जणांना आयुर्वेदिक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले. सध्या या सर्वांवर आरोग्य यंत्रणेचे लक्ष असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्यातून आत्तापर्यंत कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने एकूण २० जणांचे नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यासर्वांचा अहवाल सोमवारपर्यंत (दि.३०) जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहे. यापैकी केवळ एक बाधीत रुग्ण वगळता इतर सर्व १९ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. सुदैवाने मागील चार दिवसात जिल्ह्यात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळून आला नाही. तर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाची यंत्रणा उपाय योजना राबवित आहे.

१४ जणांना ठेवले विलगीकरण कक्षात
गोंदिया येथील कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या एकूण १४ जणांना आत्तापर्यंत आयुवेर्दीक महाविद्यालयात तयार करण्यात केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर सदर बाधीत युवक आणि त्याच्या कुटुंबीयांकडून माहिती घेऊन त्याच्या संपर्कात मागील दहा दिवसात कोण कोण आले याची माहिती घेऊन त्यांना ट्रेस करण्याचे काम सुरू असल्याचे येथे उपचार करीत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले.

मेडिकलच्या ओपीडीची गर्दी वाढली
कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, साधा ताप आला तरी आता नागरिक डॉक्टरांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे मागील तीन चार दिवसांपासून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) बाह्यरुग्ण तपासणी विभागात दररोज रुग्णांची गर्दी वाढत आहे. दररोज जवळपास एक हजाराहून अधिक रुग्ण येत असल्याची माहिती आहे.

खासगी डॉक्टरांची प्रॅक्टीस बंद
कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मात्र याचा काहीसा धसका जिल्ह्यातील काही खासगी डॉक्टरांनी सुध्दा घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांचे क्लिनीक बंद असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांचे मोठे हाल होत असून त्यांना सुध्दा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

शहरी आणि ग्रामीण भागात सॅनिटायझेशनवर भर
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरी भागातील नगर परिषद, नगरपंचायत आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे. भागील तीन चार दिवसांपासून फवारणीसह सॅनिटायझेशन केले जात आहे. गावात स्वच्छता मोहीम राबवून दक्षता घेतली जात असल्याचे चित्र आहे.

शंभर खाटांच्या कक्षाची तयारी सुरू
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने प्रत्येक जिल्ह्यात शंभर खाटांचे विशेष कक्ष तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या शंभर खाटांचे कक्ष तयार करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संगिता पाटील यांनी लोकमतशी बोलतांना दिली.

नागरिकांनो घाबरु,नका घरातच थांबा
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणूनच देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. हा निर्णय शासनाने नागरिकांच्या हितासाठीच घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच कोरोना संदर्भात सुरू असलेल्या अफवांना न घाबरता घरातच आपल्या कुटुंबीयांसह सुरक्षित राहावे. तसेच कोरोना विरुध्दच्या लढाईत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन लोकमतने केले आहे.

Web Title: The search for those who came in contact with the Corona positive youth in Gondia started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.