हंगामातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:37 PM2019-05-25T22:37:08+5:302019-05-25T22:37:31+5:30
मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच शनिवारीपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात अधिक वाढ झाली आहे. शनिवारी जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुढील आठ दिवस तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच शनिवारीपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात अधिक वाढ झाली आहे. शनिवारी जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुढील आठ दिवस तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यावासीय चांगलेच त्रस्त झाले असून याचा दैनदिन कामांवर सुध्दा परिणाम होत आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक ४४.४ तापमानाची नोंद यंदा २१ मे रोजी झाली. त्यानंतर तापमानाचा हा रेकार्ड मोडत शनिवारी (दि.२५) ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मे महिन्यातील हे सर्वाधिक तापमान होय. मागील सात आठ वर्षातील तापमानाच्या आकडेवारी नजर टाकल्यास यंदा मे महिन्यात सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण आहे.तर कधी ढगाळ वातावरण सुध्दा निर्माण होत असल्याने उकाडा वाढत आहे. त्यामुळे कुलर,पंखे सुध्दा काम करीत नसल्याने अंगाची लाहीलाही होत आहे.
वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेस शहरातील रस्ते सामसुम होत आहे. आवश्यक काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. शनिवारपासून नवतपाला सुरूवात झाली. या कालावधी सरासरी तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअस वाढ होत असते. त्यामुळे हे नऊ दिवस म्हणजे अतिशय उष्ण असतात. नवतपा सुरू झाल्यानंतर शेतकरी सुध्दा शेतीच्या मशागतीच्या कामे पहाटेपासून सुरू करुन सकाळी दहा वाजेपर्यंत आटोपत असतात. मात्र यंदा सरासरी तापमान हे ४३ अंश सेल्सिअसच्यावर असल्याने नवतपात जिल्ह्याचे तापमान ४५ अंशावर जाण्याचा अंदाज वर्तविला जात होता. तो अंदाज सुध्दा खरा ठरत आहे. नवतपामुळे जिल्ह्यावासीयांना ४ जूनपर्यंत उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणाऱ्या आहे.त्यामुळे कधी एकदाचा उन्हाळा संपतो आणि पावसाळ्याला सुरूवात होवून उकाड्यापासून दिलासा मिळतो, याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.