१२० आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:30 AM2021-02-16T04:30:58+5:302021-02-16T04:30:58+5:30
गोंदिया : लसीकरणाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारी रोजी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर आता २८ दिवस पूर्ण झाल्याने दुसरा ...
गोंदिया : लसीकरणाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारी रोजी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर आता २८ दिवस पूर्ण झाल्याने दुसरा डोस देण्यात आला. या अंतर्गत, जिल्ह्यात १२० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तर सोमवारी पहिला व दुसरा डोस अशा एकूण २९६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
भारतात तयार झालेल्या लसींना केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर १६ जानेवारीचा मुहूर्त काढून अवघ्या देशातच जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. २ डोस असलेल्या या लसीत २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावयाचा होता व तो कालावधी झाल्याने सोमवारी (दि.१५) दुसऱ्या डोसच्या लसीकरणाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात २१३ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला होता. त्यानुसार या २१३ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देणे अपेक्षित होते; मात्र सोमवारी १२० आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला.
जिल्ह्यात सोमवारी घेण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत एकूण २९६ जणांना लस देण्यात आला आहे. यामध्ये १२० आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस तर १७६ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. यामध्ये ८६ फ्रंटलाईन कोरोना वॉरियर्स तर ९० आरोग्य कर्मचारी आहेत. केंद्रनिहाय बघितल्यास गोरेगाव येथील केंद्रावर २६, सालेकसा ६३, सडक-अर्जुनी २, आमगाव ४, बीजीडब्ल्यू रुग्णालय ७, केटीएस रुग्णालय ५९, देवरी ६३, तिरोडा ५२ तर मोरगाव -अर्जुनी येथील केंद्रावर २० जणांना लस देण्यात आली आहे.