कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील २३ हजार शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:00 AM2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:23+5:30
महात्मा जोतिबा शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तीन टप्प्यात जाहीर करण्यात येणार असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी २४ फेब्रुवारीला तर दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील २९ हजार ७५ शेतकरी पात्र ठरले होते. २४ फेब्रुवारीला कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १५६ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.२८) रात्री उशिरा दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात जिल्ह्यातील २३ हजार ३३७ शेतकऱ्यांच्या समावेश आहे. पुढील ४८ तासांच्या कालावधीत या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे.
महात्मा जोतिबा शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तीन टप्प्यात जाहीर करण्यात येणार असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी २४ फेब्रुवारीला तर दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली. या योजनेसाठी गोंदिया जिल्ह्यातील एकूण २९ हजार ७५ शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी पहिल्या यादीत १५६ आणि दुसऱ्या यादीत २३ हजार ३३७ शेतकऱ्यांचा समावेश असून उर्वरित ६ हजार शेतकऱ्यांची यादी मंगळवारपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकानी युध्द स्तरावर शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्डसह लिंक करुन त्यांचे अर्ज शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केले.
त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेले सर्वाधिक १५ हजार २३० शेतकरी जिल्हा बँक तर राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकेच्या खातेदार शेतकऱ्यांची संख्या ८१०७ आहे.
एकूण पात्र शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास जिल्हा बँकेचे १९ हजार १९१ आणि राष्ट्रीयकृत बँकेचे ९९६४ शेतकऱ्यांच्या समावेश आहे. त्यामुळे तिसऱ्या यादीत पात्र उर्वरित शेतकऱ्यांचा समावेश असणार असल्याचे जिल्हा सहकार निबंधक के.पी.कांबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
आचारसंहितेबाबत संभ्रम ठरला कारणीभूत
महात्मा जोतिबा शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी २८ फेब्रुवारीला सकाळी जाहीर करण्यात येणार होती. मात्र राज्यात काही जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका असल्याने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे या कालावधी याद्या जाहीर झाल्यास आचारसंहितेचे उलघंन तर होणार नाही. असा तांत्रिक पेच निर्माण झाला होता. तांत्रिक बाबींचा अभ्यास करुन शुक्रवारी रात्री उशिरा कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे खातेदार कर्जमाफीस पात्र ठरले,त्यांना या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यांनी ते काम वेळेत पूर्ण केले. त्यामुळे जिल्हा बँकेचे सर्वाधिक १५ हजार २३० शेतकऱ्यांचा पहिल्या व दुसऱ्या यादीत समावेश आहे.
- राजेंद्र जैन, अध्यक्ष गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.