कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:45+5:302021-05-30T04:23:45+5:30
गोंदिया : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत आहे, तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...
गोंदिया : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत आहे, तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरासह ग्रामीण भागातसुध्दा बाधितांची संख्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आता जिल्ह्यात पूर्णपणे ओसरायला लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. ही जिल्हावासीयांसाठी समाधानकारक बाब असली तरी नागरिकांनी पूर्वीइतकीच काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात शनिवारी (दि.२९) ९० बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ६० नवीन रुग्णांची नोंद झाली. दोन रुग्णांचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी दुसरीकडे मात्र बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे ही बाब थोडी चिंताजनक आहे. बाधितांचे मृत्यूचे सत्र थांबत असल्याने मृत्युदर १.६१ टक्क्यावर पोहोचला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असला तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी अधिक काळजी घेत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १,६२,६४४ जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,३७,१९५ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १,५६,८३१ नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १,३५,९७६ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४०,५९० कोरोनाबाधित आढळले, त्यापैकी ३९,५३८ जणांनी कोरोनावर मात केली. सद्य:स्थितीत ३६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ६८१ जणांचे चाचणी अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत.
...................
१८२८ चाचण्या; ६० पॉझिटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी ६६० आरटी-पीसीआर आणि ११४८ रॅपिड अँटिजन अशा एकूण १८२८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ६० कोरोनाबाधित आढळले. बाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट ३.२८ टक्के आहे.
..............
प्रयोगशाळेत आता दोन आरटी-पीसीआर मशीन
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणखी एक आरटी-पीसीआर चाचणी मशीन दाखल झाली. यामुळे आता प्रयाेगशाळेत दररोज १८०० ते २२०० चाचण्या करणे शक्य होणार आहे. त्यामुळे स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रलंबित राहण्याची समस्या मार्गी लागणार आहे.
............
२ लाख ४० हजार नागरिकांनी केले लसीकरण
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यातील १४० केंद्रावरुन लसीकरण केले जात आहे. यातंर्गत आतापर्यंत २ लाख ४० हजार ९३६ नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.