कोरोनाची दुसरी लाट ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:20 AM2021-06-19T04:20:15+5:302021-06-19T04:20:15+5:30
गोंदिया : कोरोनाला जिल्ह्यात १ जूनपासून उतरती कळा लागली आहे. बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या तिप्पट असल्याने कोरोनाची ...
गोंदिया : कोरोनाला जिल्ह्यात १ जूनपासून उतरती कळा लागली आहे. बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या तिप्पट असल्याने कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसऱ्याला लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. तर कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील ९४ वर आली असून यापैकी ६३ रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत.
शुक्रवारी (दि. १८) जिल्ह्यातील १३ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ७ नवीन रुग्णांची नोंद झाली. १ बाधिताचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. मागील आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत प्रथमच कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कोराेनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात येत असून दुसरी लाट सुद्धा ओसरली आहे. राज्यात सर्वात कमी रुग्णांची नोंद गोंदिया जिल्ह्यात झाली असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा ०.२७ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात केवळ ६३ रुग्णांची नोंद झाली तर दोनशेवर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १८,५३२६ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६,००७९ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत १९,७६१८ नमुन्याची चाचणी करण्यात आली. त्यात १७,६६८५ नमुने निगेटिव्ह आले आहे. सद्या स्थितीत ९४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून २२१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयाेगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
............
३,५६४ नमुन्यांची चाचणी पॉझिटिव्ह केवळ ७
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी एकूण ३,५६४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात १,०८४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,४७८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ७ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१९ टक्के आहे.
.............
दररोज साडेतीन हजार नमुन्यांची चाचणी
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत दररोज साडेतीन हजारावर स्वॅब नमुन्यांची चाचणी केली जात आहे. प्रयोगशाळेत आता दोन आरटीपीसीआर चाचणी मशीन आल्या आहेत. नमुने तपासणीला वेग आला असून फार कमी प्रमाणात नमुने प्रलंबित राहत आहेत.
..............