माध्यमिक शाळांनाही लागली घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 10:20 PM2018-07-05T22:20:24+5:302018-07-05T22:21:49+5:30
नगर परिषदेच्या शाळांना विद्यार्थी पटसंख्या घसरणीचा आजार लागला आहे. यापासून प्राथमिक शाळा तर सोडाच मात्र माध्यमिक शाळाही (वर्ग ५-१०) सुटलेल्या नाहीत. प्राथमिक शाळाप्रमाणेच नगर परिषदेच्या माध्यमिक शाळांतही पटसंख्या सातत्याने घट सुरू असून यंदाही तोच प्रकार घडत असल्याचे चित्र आहे.
कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेच्या शाळांना विद्यार्थी पटसंख्या घसरणीचा आजार लागला आहे. यापासून प्राथमिक शाळा तर सोडाच मात्र माध्यमिक शाळाही (वर्ग ५-१०) सुटलेल्या नाहीत. प्राथमिक शाळाप्रमाणेच नगर परिषदेच्या माध्यमिक शाळांतही पटसंख्या सातत्याने घट सुरू असून यंदाही तोच प्रकार घडत असल्याचे चित्र आहे. परिणामी विद्यार्थ्यांनी गजबजणाऱ्या शाळांमध्ये आता मोजकेच विद्यार्थी दिसून येतात.
प्राथमिक शाळांप्रमाणेच नगर परिषदेच्या पाच माध्यमिक शाळा आहेत. यात एक कन्या शाळा आहे. शिवाय एक कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा नगर परिषदेव्दारा संचालीत आहे. खाजगी शाळांमुळे नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा ओस पडत असताना माध्यमिक शाळांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. मात्र प्राथमिक शाळांच्या तुलनेत माध्यमिक शाळांची स्थिती उत्तम आहे. कारण माध्यमिक शाळांत बोटावर मोजण्या इतके विद्यार्थी नसल्याचे दिसून येते. खाजगी शाळांमधील शिकवणीच्या तुलनेत कोठेतरी या शाळा मात्र आता कमकुवत पडत असल्याचे असल्याचे बोलल्या जाते. कधी विद्यार्थ्यांनी खचाखच भरून असणाऱ्या या शाळा आता ओसाड पडत आहेत.एकंदर माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी सुध्दा खाजगी शाळांकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. माध्यमिक शाळांकडे बघता काहींची पटसंख्या मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेली दिसत आहे. सध्या शाळा सुरू झाल्या असून यामध्ये आणखीही वाढ होते काय याकडे लक्ष आहे.
कनिष्ठ महाविद्यालयात ४०० विद्यार्थी
नगर परिषद संचालित कनिष्ठ महाविद्यालयाची यंदाची सुरूवातीची पटसंख्या ४०० आहे. शाळांच्या तुलनेत महाविद्यालयाची यापूर्वीची स्थिती चांगली होती. मात्र यंदा ४०० विद्यार्थी पटसंख्या आर्श्चयाची व तेवढीच धक्कादायक बाब आहे. यामुळे पटसंख्या घसरण्याची लागण कनिष्ठ महाविद्यालयालाही लागल्याचे चित्र आहे.
नगर परिषदेकडे माहितीचा अभाव
नगर परिषदेव्दारा संचालित शाळांचा किती टक्के निकाल लागला. तसेच यंदा किती विद्यार्थी आहेत याबाबत मुख्याध्यापकांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रशासनीक अधिकारी यांच्याकडे माहिती देणे अपेक्षीत आहे. मात्र दहावी व बारावीचा निकाल लागून आता महिना लोटला आहे. तसेच शाळा सुरू होऊन आता १० दिवसांपेक्षा जास्त झाले आहे. मात्र यानंतरही माध्यमिक शाळांचा निकाल व पटसंख्येबाबत माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांच्याकडे माहिती नाही. यावरून नगर परिषद शाळांचा कारभार किती सुरळीत सुरू आहे हे दिसून येते.