बचत गटांना आत्मनिर्भरतेसाठी ४१.५८ लाखाचे बीज भांडवल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:11+5:302021-06-01T04:22:11+5:30
गोंदिया : कोरोनाच्या काळात अनेक उद्योगांची वाताहत झाली. उद्योगांना आर्थिक उभारी देण्यासाठी केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले. ...
गोंदिया : कोरोनाच्या काळात अनेक उद्योगांची वाताहत झाली. उद्योगांना आर्थिक उभारी देण्यासाठी केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले. यातून प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग पुन्हा उभे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांना प्रत्येकी चार लाखाचे बीज भांडवल उपलब्ध करून दिले आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ४५ महिलांना वैयक्तिक तर १० स्वयंसहायता बचत गटांना याचा लाभ मिळाला आहे. याकरिता ४१ लाख ५८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या उद्योगांना चांगले दिवस येणार आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्यपदार्थ उद्योग उन्नयन केंद्र पुरस्कृत अभियान आहे. अन्न व प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत महिला बचत गटांना १५ टक्के अनुदान स्वरूपात निधी प्राप्त होत आहे. गावागावात अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून अन्नप्रक्रिया उद्योग सुरू आहे. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा गाडा हाकलला जात आहे. यामध्ये पापड, लोणचे तयार करणे, कुरुडी, हळद, दुधापासून तयार केलेल्या विविध वस्तू यांच्या उद्योगात समावेश आहे. या उद्योगांना उभारी देण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना २०२१ ते २०२५ या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन केले आहे. यातून ग्रामीण जीवन्नोती अभियान आतील स्वयंसहाय्यता बचत समूहातील एका सदस्याला ४० हजार रुपये बीज भांडवल देण्यात येणार आहे. एका गटातील सदस्यांना मिळून चार लाख रुपये मिळणार आहे. या अंतर्गत विविध प्रशिक्षण विपणन व्यवस्था आदी मार्गदर्शन लाभणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील २२९ महिला व स्वयं सहायता समूहांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यात आमगाव तालुका १२, अर्जुनी-मोरगाव ६, देवरी १०, गोरेगाव १२, तिरोडा १५ अशा ५५ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
बॉक्स
२२९ महिलांनी केली ऑनलाइन नोंदणी
उमेद अभियानातील महिला बचत गटांना या योजनेतून लाभ मिळावा याकरिता ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी उमेद अभियाना अंतर्गत आवाहन करण्यात आले होते. जास्तीत जास्त गटातील महिलांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, उमेदचे अभियान व्यवस्थापक अमोल भागवत यांनी नियोजन केले होते. तालुका स्तरावर कार्यरत अधिकारी व प्रभाग संघात कार्यरत उमेश अधिकाऱ्यांनी ही योजना महिलांपर्यंत पोहोचविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २२९ महिला व स्वयंसहायता समूहांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.