धान केंद्रावरील धानाला फुटले अंकुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 06:00 AM2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:19+5:30
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्रीच्या माध्यमातून तालुक्यात शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याकरीता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा व त्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये याकरीता धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र गोरठा केंद्रावरील नियोजन शून्यतेमुळे शेतकऱ्यांचे धान पावसात भिजले.
मुरलीधर करंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : जिल्ह्यात गुरूवार आणि शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शासकीय धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला. तालुक्यातील गोरठा येथील शासकीय धान खरेदी केंद्रावरील अनेक शेतकºयांचे धान भिजल्याने धानाला अंकुर फुटले. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रावरुन धान परत नेण्याची वेळ आली.खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळेच शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. मात्र तेच शेतकऱ्यांना अंकुरीत झालेला धान स्विकारता येणार नाही असे सांगून परतावून लावत आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्रीच्या माध्यमातून तालुक्यात शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याकरीता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा व त्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये याकरीता धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र गोरठा केंद्रावरील नियोजन शून्यतेमुळे शेतकऱ्यांचे धान पावसात भिजले. शुक्रवारी (दि.७) सकाळी झालेल्या पावसामुळे जवळपास सात हजार पोते धान पावसात भिजले. २२ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान गोदाम फुल्ल झाल्यामुळे खरेदी बंद होती. त्यामुळे मागील एक महिन्यापासून शेतकऱ्यांचे धान परतीच्या पावसात भिजत राहिले. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या धानाला अंकुर फुटले आहे.
हे अंकुरीत धान व ओले धान आम्ही घेणार नाही अशी भूमिका धान खरेदी केंद्राने घेतली आहे. त्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट कोसळले आहे. धान खरेदी करण्यात केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी उशीर केला. यात आमचा काय दोष अशी संतप्त प्रतिक्रिया धान खरेदी केंद्रावर उपस्थित शेतकऱ्यांनी दिली. आम्ही आपले दैनंदिन काम सोडून दररोज केंद्रावर येतो. परंतु आपण शेतकऱ्यांचे धान खरेदी न करता व्यापाºयांचे धान खरेदी करीत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला.
सात हजार धानाचे पोते भिजले
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या गोरठा येथील धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेले सात हजार पोते धान गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भिजले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या धानाची नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
सुरक्षाविषयक सुविधांचा अभाव
आमगाव तालुक्यातील आमगाव, गोरठा, कालीमाटी, तिगाव, अंजोरा, कट्टीपार या सहा केंद्रावर धान खरेदी करण्यात येते. या केंद्रावर शेतकºयांचा धान खरेदी करण्याकरीता पुरेशा गोदामाची व्यवस्था नसल्यामुळे अनेक दिवस धान खरेदी केंद्राबाहेर पडून असतो. आधारभूत धान खरेदी केंद्रावर सुरक्षा भिंत नसल्यामुळे मोकाट जनावरे परिसरात येतात व धानाची पोती फाडतात व धान खराब करतात त्याचा फटकाही शेतकºयांना बसतो.
शासकीय धान खरेदी केंद्रावरुन सुरू असलेल्या सावळा गोंधळाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव धान खाजगी व्यापाऱ्यांकडे विक्री करण्याची पाळी येते. तर खरेदी केंद्रावरुन कधी धानाची चोरी सुध्दा होते.
- सुरेश हटवार,रा. खुर्शीपार, शेतकरी
केंद्र संचालकांनी धानाला अंकुर आल्यामुळे धान परत नेण्याकरीता सांगितले आम्ही दहा दिवसांपासून धानाची विक्री करण्यासाठी पायपीट करीत काटा करण्यास केंद्रावरील कर्मचाऱ्यांमुळे विलंब झाला यात आमचा काय दोष.
- सुरेंद्र हरिणखेडे, माजी सरपंच दहेगाव
शासकीय आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांच्या धानाच्या प्राधान्य न देता व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्यात येते. या प्रकारामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
- डाकचंद हिरदीलाल पटले, रा.चिरचाळबांध,
पंधरा दिवसांपासून धान खरेदी केंद्रावर सतत फेऱ्या मारतोय पण आमच्या धानाची खरेदी करण्यात आली नाही. शेवटी धान पावसात भिजले.
- रतनलाल रिनाईत,चिरचाळबांध
२२ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान गोदामातून धानाची उचल झाली नाही. त्या दरम्यान केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास उशीर झाला व परतीच्या पावसाने नियोजन बिघडले.
- हेमराज सुलाखे, केंद्र संचालक गोरठा