बनावट परवान्याच्या आधारे सर्रास ‘ड्रिंकिंग वॉटर विक्री’, ३२ हजारांचा माल जप्त
By नरेश रहिले | Published: November 3, 2023 07:15 PM2023-11-03T19:15:55+5:302023-11-03T19:38:19+5:30
ही कारवाई १ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. या कारवाईत एक लिटरचे ६२६ बॉक्स, तर अर्धा लिटरचे ३२७ बॉक्स पाणी जप्त करण्यात आले आहे.
गोंदिया : बनावट परवाना क्रमांक छापून विनापरवाना पेंडेड ‘ड्रिंकिंग वॉटर शिवनाथ ब्रँड’चे उत्पादन करून विक्री करीत असलेल्या छोटा रजेगाव येथील साईकृपा लिव्हरेजेस या प्रतिष्ठानावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई १ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. या कारवाईत एक लिटरचे ६२६ बॉक्स, तर अर्धा लिटरचे ३२७ बॉक्स पाणी जप्त करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १ नोव्हेंबर रोजी अन्न व सुरक्षा अधिकारी शीतल देशपांडे यांनी श्रीहरी रामजी अग्रवाल शाळेमागे छोटा रजेगाव (ता. जि. गोंदिया) येथे साईकृपा लिव्हरेजेस या पॅकेट ड्रिंकिंग वॉटर उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून त्यांनी उत्पादन केलेले एक लिटर व अर्धा लिटरचे शिवनाथ ब्रँड या पॅकेट ड्रिंकिंग वॉटरचे नमुने घेतले. तेथील एक लिटर बॉटलचे ६२६ बॉक्स व अर्धा लिटर बॉटलचे ३२७ बॉक्स असे एकूण किंमत ३१ हजार ६९६ रुपयांचा माल जप्त केला आहे.
उत्पादक हरी ओम धर्मेंद्र सलुजा, रा. छोटा राजेगाव यांना पक्का परवाना घेईपर्यंत त्वरित व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. उत्पादक बॉटलच्या लेबलवर बनावट एफएसएससी क्रमांक व कायद्यातील नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना व्यवसाय करीत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.
परवाना आवश्यक
अन्नपदार्थ व्यावसायिक जे उत्पादक, विक्रेते, वाहतूकदार, फळ, भाजीपाला विक्रेते, मांस, अंडी, मासे विक्रेते यांनी अन्नसुरक्षा मानके कायदा २००६ नुसार परवाने घेऊनच व्यवसाय करावा. परवाना हा ऑनलाइन पद्धतीने दिला जातो. शासनाच्या वेबसाइटवर कोणत्या ऑनलाईन सेवाकेंद्रातून अर्ज करावा व परवाना प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी केले आहे.