ज्येष्ठांना आले आता घरातील तरुणांच्या लसीकरणाचे टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:29 AM2021-05-21T04:29:34+5:302021-05-21T04:29:34+5:30
गोंदिया : कोरोनाने चांगलाच कहर केला असून, यापासून वृद्धांचा सर्वाधिक धोका असल्याने शासनाने ज्येष्ठ नागरिक तसेच सोबतच ४५ वर्षे ...
गोंदिया : कोरोनाने चांगलाच कहर केला असून, यापासून वृद्धांचा सर्वाधिक धोका असल्याने शासनाने ज्येष्ठ नागरिक तसेच सोबतच ४५ वर्षे वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. त्यानुसार, आता ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. मात्र मध्यंतरी सुरू करण्यात आलेले १८ वर्षांपासूनच्या तरुणांच्या लसीकरणाला ब्रेक लावण्यात आला आहे. यामुळे घरातील ज्येष्ठांना आता तरुणांच्या लसीकरणाचे टेन्शन आले आहे.
कोरोनामुळे घरातील तरुण ज्येष्ठांना घराबाहेर पडण्यास मनाही करीत असून, घराबाहेरची कामेही तेच आटोपून घेत आहेत. शिवाय कामावर जावयाचे असल्याने त्यांना घराबाहेर पडणे टाळता येत नाही. अशात मात्र त्यांच्याचसाठी कोरोना लसीचे कवच अद्याप उपलब्ध झाले नाही. यामुळे ४५ वर्षांपुढे वयोगटातील नागरिक लसीकरणाने सुरक्षित झाले आहेत. मात्र १८ ते ४४ वर्षांपर्यंतचा युवा गट मात्र अद्याप कोरोनाच्या धोक्यातच वावरत असल्याने घरातील ज्येष्ठांना आता त्यांच्या सुरक्षेची चिंता सतावत आहे. १८ वर्षांपासून पुढे सर्वांसाठीच लसीकरण सुरू करावे, अशी मागणी आता त्यांच्याकडून केली जात आहे.
--------------------------------
प्रतिक्रिया
कामानिमित्त आमच्या मुलांना दररोज घराबाहेर जावे लागते. ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे ते असल्याने त्यांचे लसीकरण झालेले नाही. १८ वर्ष वयोगटांचे लसीकरण आता बंद आहे. आता मुलांच्या सुरक्षेची चिंता सतावत असून, १८ वर्षे वयोगटांवरील सर्वांनाच लस द्यावी.
- निहारीलाल दमाहे ()
-----------------------------------
कोरोनाच्या भीतीमुळे लसीकरणानंतरही आमची मुले आम्हाला घराबाहेर पडू देत नाहीत. मात्र ते आपल्या कामांसह घरातील कामेही करीत आहेत. ४५ वर्षे वयोगटाच्या आत ते असल्याने त्यांचे लसीकरण झालेले नाही. यामुळे आता त्यांच्या सुरक्षेची चिंता सतावत असून लवकरात लवकर त्यांचेही लसीकरण करण्याची गरज आहे.
- वासुदेव जगताप
---------------------------------
कोरोना लसीकरणात ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील युवा वर्गाला प्राधान्य देण्यात आले असून, त्यांचे लसीकरण सुरू आहे. मात्र १८ ते ४४ वर्षे वयोगटातील तरुण व युवांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. आमची मुले याच वयोगटात येत असून, तेच घरातील व स्वत:ची कामे करीत आहेत. त्यांची चिंता सतावते.
- प्रमोद बागडे