कोविड रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:39 AM2021-02-27T04:39:01+5:302021-02-27T04:39:01+5:30
गोंदिया : कोरोना महामारीने पुन्हा डोकेवर काढल्याने राज्य सरकारने कोविड-१९ रुग्णांवर उपचारासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभारावी म्हणजे रुग्णांची जादा ...
गोंदिया : कोरोना महामारीने पुन्हा डोकेवर काढल्याने राज्य सरकारने कोविड-१९ रुग्णांवर उपचारासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभारावी म्हणजे रुग्णांची जादा बिलात फसवणूक होणार नाही. अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य सरकारतर्फे राज्यातील सर्व रहिवाशांना महात्मा फुले योजनेअंतर्गत विना शुल्क कोविड-१९ उपचार पुरविण्यात येतील ,असे जाहीर करण्यात आले असले तरी यावर देखरेख करणारी एक स्वतंत्र यंत्रणा राज्य सरकारने निर्माण करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र विदर्भ प्रांताने एका निवेदनाद्वारे आरोग्य मंत्र्याकडे यापूर्वी केली होती. परंतु रुग्णालयांनी रुग्णांवर भरमसाठ बिल लावून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याच्या तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र विदर्भ प्रांताकडे आल्या आहेत. त्यांना योग्य तो न्याय मिळत नाही तोच कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे. कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी घुसमट आणि सर्वत्र चाललेला गोंधळ लक्षात घेता यावर देखरेख करणारी यंत्रणा उभारुन रुग्णांना याचा लाभ मिळतो की नाही याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, विदर्भ संघटक डॉ. कल्पना उपाध्याय, विदर्भ प्रांत सचिव लिलाधर लोहरे यांनी लक्ष वेधले आहे. २३ मे २०२० रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्याचे रहिवासी असलेल्या सर्वांना विना शुल्क कोविड-१९ उपचार पुरविण्यात येतील. उपचारांचा खर्च हा महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शासनााकडून उचलण्यात येईल असे सांगितले आहे. प्रत्यक्षात रुग्णालयाने स्वत:हून सदर योजनेचा लाभ द्यावयाचा आहे न दिल्यास ग्राहक आयोगाकडे जाऊन भरलेले पैसे सुद्धा परत घेता येतील आणि या देखरेख यंत्रणेने त्यांना दंड करावा, असे ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष दुर्गेश्वर रहांगडाले, संघटक राजेश कनोजिया, जिल्हा सचिव आदेश शर्मा, महिला संघटक शितल रहांगडाले, उपाध्यक्ष सोमवंशी, कोषाध्यक्ष जयरामसिंह जतपेले, सहसचिव गोविंद शर्मा, विधी सल्लगार ॲड. आनंद दुबे, ॲड. अर्चना नंदघाले, वर्षा बडगुजर, राजेश्वर कनोजिया, ऋषिकेश पांढरीपांडे, विशाल रहांगडाले यांनी या निवेदनातून केली.