गंभीर रूग्णांना दिले जीवदायी प्लाझ्माचे डोज,मिळाली संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 05:00 AM2020-12-11T05:00:00+5:302020-12-11T05:00:02+5:30
कोरोनावर अद्याप तरी काहीच औषध हाती आलेले नाही. अशात कोरोना हा तेवढाच धोकादायक व जीवघेणा ठरत आहे. डॉक्टरांकडून उपलब्ध औषधांनीच रूग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांसाठी आजघडीला प्लाझ्मा हेच जीवदायी शस्त्र डॉक्टरांच्या हाती आहे. आतापर्यंत प्लाझ्मा जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने रूग्णाच्या नातेवाईकांना नागपूरची धाव घ्यावी लागत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांना जीवदायी ठरत असलेल्या प्लाझ्मा युनिटचे फायदे आता जिल्ह्यात दिसू लागले आहेत. येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर स्थितीतील दोन रूग्णांना प्लाझ्मा देण्यात आला आहे. परिणामी प्लाझ्मा युनिटचे कार्य सार्थकी लागत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
कोरोनावर अद्याप तरी काहीच औषध हाती आलेले नाही. अशात कोरोना हा तेवढाच धोकादायक व जीवघेणा ठरत आहे. डॉक्टरांकडून उपलब्ध औषधांनीच रूग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांसाठी आजघडीला प्लाझ्मा हेच जीवदायी शस्त्र डॉक्टरांच्या हाती आहे. आतापर्यंत प्लाझ्मा जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने रूग्णाच्या नातेवाईकांना नागपूरची धाव घ्यावी लागत होती. त्यातही गरींबासाठी हे शक्य नसल्याने कित्येकांचा जीव गेला व मृतांची आकडेवारी १७० घरात आली आहे. यातूनच गोंदिया जिल्ह्यात प्लाझ्मा युनिट सुरू करण्याची मागणी केली जात होती. जिल्ह्यात नुकतीच मंगळवारी (दि.८) प्लाझ्मा युनिट सुरू झाली व आतापर्यंत चार डोनर्सने पुढाकार घेत प्लाझ्मा दान केले. विशेष म्हणजे, जिल्ह्यात प्लाझ्मा युनिट सुरू होताच त्याचा लाभही जिल्हावासीयांना होत असल्याचे दिसून येवू लागले आहे.
बुधवारी (दि.९) येथील एका खाजगी रूग्णालयात गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णाला यातील एक युनिट देण्यात आले आहे. तर गुरूवारी (दि.१०) खासगी रूग्णालयातीलच गंभीर रूग्णाला युनिट देण्यात आल्याची माहिती आहे. एकंदरीत कोरोनामुळे रूग्णाचा जीव जावू नये यासाठी सुरू करण्यात आलेली प्लाझ्मा युनिट सार्थकी लागल्याचे दिसत आहे.
रक्त केंद्रात सहा बॅग जमा
ज्या चार डोनर्सकडून प्लाझ्मा घेण्यात आले आहेत त्यांच्यात एका डोनरकडून दोन बॅग घेतल्या जातात. अशाप्रकारे आठ बॅग जमा झाल्या होत्या. यातील दोन बॅग गंभीर रूग्णांना देण्यात आल्या आहेत. तर ए-पॉजिटिव्ह ग्रुुपच्या दोन, ओ-पॉझिटिव्ह ग्रुपच्या तीन आणि बी-पॉझिटिव्ह ग्रुपची एक बॅग रक्त केंद्रात जमा आहे. यात मात्र, खासगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार ५५०० रूपये आकारले जातात. तर शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना नि:शुल्क प्लाझ्मा दिला जात आहे.
कोरोना योद्धांनी पुढे यावे
कोरोना या जीवघेण्या आजारावर मात करणारा प्रत्येकच व्यक्ती आज कोरोना योद्धा ठरत आहे. तर हाच योद्धा अन्य रूग्णालाही या आजारावर मात करून जीवदान देणारा ठरत आहे. अशात कोरोनावर मात करून डिस्चार्ज होऊन २८ दिवस झालेल्या कोरोना योद्धाला प्लाझ्मा दान करता येतो. या प्लाझ्मा दानमुळे एखाद्या गंभीर रूग्णाचा जीव वाचविता येतो. त्यामुळे अशा या कोरोना योद्धांनी आता अन्य रूग्णांना जीवदान देण्यासाठी पुढे यावे असे गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, प्लाझ्मा युनिटचे प्रमुख डॉ. संजय चव्हाण, जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे यांच्यासह रक्तकेंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही कळविले आहे.