यश गाठण्यासाठी ध्येय निश्चित करा

By admin | Published: January 11, 2016 01:34 AM2016-01-11T01:34:59+5:302016-01-11T01:40:10+5:30

आजच्या महाविद्यालयीन युवकांनी ध्येयवादी रहावे. महाविद्यालयात पदार्पण केल्यानंतर जीवनाच्या खऱ्या आयुष्याचा प्रारंभ होतो.

Set goals for achieving success | यश गाठण्यासाठी ध्येय निश्चित करा

यश गाठण्यासाठी ध्येय निश्चित करा

Next

पालकमंत्री बडोले : विद्यापीठस्तरीय रासेयो शिबिराचे उद्घाटन
बोंडगावदेवी : आजच्या महाविद्यालयीन युवकांनी ध्येयवादी रहावे. महाविद्यालयात पदार्पण केल्यानंतर जीवनाच्या खऱ्या आयुष्याचा प्रारंभ होतो. सकारात्मक विचारांना अंगिकारून युवकांनी प्रगतीच्या वाटा शोधण्यास प्राधान्य द्यावे. आजचा युवक उद्याचा भाग्यविधाता, समाजाचा शिल्पकार ठरेल. त्यामुळे आजच विद्यार्थ्यांनी आपले उच्चप्रतीचे ध्येय निश्चित करून प्रगतीच्या वाटा शोधण्यास प्रथम प्राधान्य द्यावे, असा हितोपदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिला.
येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर तसेच अर्जुनी-मोरगाव येथील शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान या संकल्पनेवर आधारित विद्यापीठस्तरिय सात दिवशीय रासेयो शिबिराचे १५ जानेवारीपर्यंत आयोजन केले आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्याचे दायित्व युवकांना मिळते. आई-वडील तसेच समाजाप्रती आपली काही जबाबदारी आहे, याचे भान ठेवून युवक वर्गाने ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहिल्यास, निश्चितच संकटांवर मात करणे सहज शक्य आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी निरंतन प्रयत्न, जिज्ञासा आत्मसात कल्यास प्रगतीचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही, असे ते म्हणाले.
उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी दुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लुनकरण चितलंगे होते. अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी आ. दयाराम कापगते, संस्था सचिव मुकेश जायस्वाल, स्थानिक सरपंच राधेश्याम झोळे, नामदेव कापगते, सुदाम डोंगरवार, यशवंत लंजे, तालुका भाजपा अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, बद्रीप्रसाद जायस्वाल, प्राचार्य डॉ. संजीव पाटणकर उपस्थित होते. ‘या भारतात बंधु भाव नित्य वसुदे, देवरची अशा दे’ या विद्यापीठ गीताने उद्घाटनीय कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
ना. बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून राज्य सरकारच्या वतीने डॉ. आंबेडकर यांचे लंडन येथील घर राज्य सरकारने घेतले. इंदू मिलची साडेबारा एकर जागा मिळविण्यात आली. संविधान दिनी प्रास्ताविकेचे वाचन, असे विविध उपक्रम राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने ना. बडोले, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांचा संस्थाध्यक्ष लुनकरण चितलंगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व ग्रामगीता भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. दिलीप काकडे यांनी केले. प्रास्ताविक शिबिर संयोजक प्रा. शरद मेश्राम यांनी मांडले. आभार डॉ. राजेश चांडक यांनी मानले.(वार्ताहर)

चार जिल्ह्याचे २०० स्वयंसेवक सहभागी
सदर विद्यापीठस्तरिय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ नागपूर अंतर्गत येत असलेल्या चार जिल्ह्याच्या ३० महाविद्यालयातील २०० विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न
देशातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजण्यासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केला. आजही ठिकठिकाणी मूलभूत सोयींचा अभाव जाणवत आहे. पाणी, वीज, आरोग्य, रस्त्यांची समस्या आ वासून उभ्या आहेत. ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी युध्दस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. प्रगती झपाट्याने होत असल्याचे सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी आवर्जुन सांगितले.

रोजगाराच्या संधीसाठी स्वयंरोजगार मेळावे
जिल्हा नैसर्गिक साधन-संपत्तीने नटला आहे. जिल्ह्याचा पर्यटन विकास व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात स्वयंरोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. युवकांनी भ्रमनिराश न होता ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन ना. बडोले यांनी केले.
श्रमाची प्रतिष्ठा युवकांनी अंगिकारावी
भारताची संस्कृतीचे जतन होत असल्याने भारताकडे इतर देश आदराने पाहत आहेत. नैतिक मूल्यांची जोपासना, श्रम प्रतिष्ठा युवकांनी अंगिकारावे. युवा वर्गाने आशावादी राहून पुढील आयुष्याच्या यशस्वी वाटा शोधाव्या. स्वत:चे करिअर घडविताना मनात संभ्रम ठेवू नये, असे बडोले म्हणाले.

जि.प. सदस्याने धरली घराची वाट
रासेयो शिबिर ज्या जि.प. हायस्कूलमध्ये घेण्यात येत आहे, त्याच शाळा समितीचे अध्यक्ष तथा बोंडगावदेवी प्रभागाच्या जि.प. सदस्यास उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना सामान्यांमध्ये आसनस्थ व्हावे लागले. त्यामुळे आयोजकांप्रती नाराजी व्यक्त केली जात असून अखेर जि.प. सदस्यास घराची वाट धरावी लागली.

Web Title: Set goals for achieving success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.