नगर परिषदेत पदांसाठी सुरू झाली सेटींग
By admin | Published: February 4, 2017 01:32 AM2017-02-04T01:32:37+5:302017-02-04T01:32:37+5:30
नगर परिषदेतील नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ सुरू होण्यासाठी आता तीनच दिवस उरले आहेत.
मंगळवारपासून नवीन इनिंग : नवनिर्वाचितांचा कार्यकाळ होणार सुरू
गोंदिया : नगर परिषदेतील नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ सुरू होण्यासाठी आता तीनच दिवस उरले आहेत. येत्या मंगळवारपासून (दि.७) नवनिर्वाचितांची नवी बाजी सुरू होणार आहे. विशेष म्हणजे त्यानंतर सभापतीपदाची निवड केली जाणार असल्याने आतापासूनच पदांसाठी इच्छुकांकडून सेटींग सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
८ जानेवारी रोजी नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. मात्र विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ येत्या ६ फेब्रुवारी रोजी संपणार असल्याने नवनिर्वाचितांची एंट्री अद्याप झालेली नाही. विद्यमान कार्यवाह आपला कार्यकाळ संपल्यावरच ७ तारखेपासून नगराध्यक्ष आपले पद स्वीकारतील व नगरसेवकांची नवी बाजी सुरू होणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा येत्या ७ तारखेकडे लागल्या आहेत.
या नवनिर्वाचितांचा कार्यकाळ सुरू झाल्यावर सभापतीपदासाठी निवडणूक घेतली जाईल व त्यानंतर खऱ्या अर्थाने नगर परिषदेचा कारभार सुरू होणार आहे. नवीन पदाधिकारी विराजमान झाल्यानंतर विषय समित्यांच्या निवडीची तयारी सुरू होईल. यात कोण पदाधिकाऱ्यांची मर्जी सांभाळतो त्यावर सभापतींची निवड अवलंबून राहणार आहे. सभापतीपद आपल्या पक्षाकडे यावे यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत. सभापतीपदासाठी आतापासूनच सदस्यांकडून पक्षातील वरिष्ठांकडे सेटींग लावण्याचे काम सुरू झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे गेल्या कार्यकाळातही नगर परिषदेवर भाजपची सत्ता होती. त्यातील काहींना यावेळी डच्चू बसेल. (शहर प्रतिनिधी)