डुकरांच्या समस्येवर निघणार तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:56 PM2017-10-30T22:56:09+5:302017-10-30T22:56:22+5:30
शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरत असलेल्या डुकरांच्या समस्येवर तोडगा निघणार असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरत असलेल्या डुकरांच्या समस्येवर तोडगा निघणार असल्याचे दिसून येत आहे. कारण नगर परिषदेने विशेष सभेत तसा ठराव पारीत केला आहे. यांतर्गत परिषदेकडून डुक्कर पालकांना डुक्कर पाळण्यासाठी शहराबाहेर जागा उपलब्ध करवून दिली जाणार आहे. त्यानंतरही शहरात डुक्कर दिसल्यास मात्र जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.
विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेल्या या शहरात सध्या डुक्कर एक गंभीर समस्या बनले आहेत. शहरातील प्रत्येकच भागात डुक्कर आढळत असून यावरूनच त्यांची संख्या किती असावी याचा अंदाज लावता येतो. गल्ली असो वा मुख्य मार्ग डुकरांचा मोकाट वावर प्रत्येकच भागात दिसत असून दिवसेंदिवस हा प्रकार वाढतच चालला आहे. एवढेच नव्हे तर घरांसमोरही डुक्कर फिरत असताना बघावयास मिळतात.
घाण पसरवणारा हा प्राणी आजारांसाठीही कारणीभूत ठरत असल्याने शहरवासी त्रस्त व तेवढेच दहशतीत वावरत आहेत. यासाठी डुकरांच्या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी शहरवासीयांकडून मागील कित्येक वर्षांपासून केली जात आहे. मात्र नगर परिषद प्रशासन या बाबीत सपशेल फेल ठरले आहे. डुकरांच्या समस्येवर नगर परिषदेकडे काहीच तोडगा नसल्याने डुकरांची संख्या व त्यांचा हैदोस शहरात वाढतच चालला आहे.
विशेष म्हणजे, नागरिकांचा वाढता रोष व मागणी लक्षात घेता नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी शुक्रवारी (दि.२७) घेतलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत डुकरांचा विषय मांडला. शहरासाठी महत्वपूर्ण असा हा विषय असल्याने सभेला उपस्थित सदस्यांनी एकमताने याला मंजुरी दिली. त्यामुळे आता शहरातील डुकरांच्या समस्येवर तोडगा निघणार असल्याचे दिसून येत आहे.
शहराबाहेर जागा
देणार
डुकरांच्या या समस्येवर तोडगा निघावा तसेच डुक्कर पालकांच्या व्यवसायावर परिणाम पडू नये यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून डुक्कर पालकांना शहराबाहेर टेमनी येथील जागा देण्याचा विचार आहे. डुक्कर पालकांना त्यांचे डुक्कर तेथे पाळता येतील. तसेच शहरातून निघणारा कचरा त्यांना खाद्य म्हणून दिला जाऊ शकतो. असे झाल्यास शहरातील कचºयाची विल्हेवाट ही लावता येईल. शिवाय डुक्करांची समस्या सुटून डुक्कर पालकांचा व्यवसायही सुरळीत राहील. यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून डुक्कर पालकांसोबत बैठक घेतली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी दिली.
अन्यथा डुक्कर जप्तीची कारवाई
नगर परिषद प्रशासनाकडून डुक्कर पालकांचा विचार करून जागा देण्याचा विचार केला जात आहे. यानंतरही डुक्कर पालकांकडून त्याला दाद न दिली गेल्यास व शहरात डुक्कर आढळल्यास मात्र डुक्कर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहर डुक्कर मुक्त करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. नगर परिषद प्रशासनाकडे याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने आता नगर परिषद प्रशासनाकडून काय केले जाते हे बघायचे आहे.
यापूर्वीचा प्रयोग फसला
काही वर्षांपूर्वी नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी डुकरांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नाशिक येथून डुक्कर पकडणाºयांचे पथक बोलाविले होते. हे पथक शहरातील डुक्कर पकडून नेणार होते. मात्र याबाबत येथील डुक्कर पालकांना माहिती मिळताच त्यांनी डुक्कर पकडण्यासाठी आलेल्यांना धमकाविले असल्याची माहिती आहे. परिणामी डुक्कर पकडण्यासाठी आलेले तसेच आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे शहरातील डुकरांची समस्या आहे तशीच आहे. आता नगर परिषद प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसली असल्याने शहरवासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. नगर परिषदेचा हा प्रयोग आता कितपत यशस्वी ठरतो हे तर येणाºया काळातच दिसेल.
शहरातील डुक्कर पालकांना अगोदर जागा देऊन त्यांच्या व्यवसायावर परिणाम पडू दिला जाणार नाही. मात्र त्यानंतरही डुक्कर शहरात दिसल्यास जप्तीची कारवाई केली जाईल.
- चंदन पाटील
मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया