चार महिन्याच्या एकत्रित वीज बिलावर हप्त्यांचा तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:30+5:30
ग्राहकांची वीज बिलाबाबत ओरड वाढल्यानंतर आणि यासंबंधी तक्रारी वाढल्यानंतर महावितरणने यावर तोडगा काढला आहे. वीज ग्राहकांना चार महिन्याचे एकत्रित आलेले वीज बिल भरण्यासाठी आता ग्राहकांना तीन हप्त्यांची सवलत दिली जाणार आहे. यासाठी एकूण बिलाच्या रक्कमेच तीन हप्ते करुन जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यात ही रक्कम भरता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता विद्युत वितरण कंपनीने कर्मचाऱ्यांना विद्युत मिटरची रिडिंग घेण्यासाठी घरोघरी पाठविणे बंद केले होते. जून महिन्यात स्थिती थोडी पूर्व पदावर आल्यानंतर मीटरची रिडिंग घेवून ग्राहकांना चार महिन्याचे एकत्रित बिल पाठविले. हे वीज बिल हाती पडताच अनेक ग्राहकांना धक्का बसला. त्यामुळे यावर ग्राहकांची ओरड सुरू झाली. यावरच तोडगा म्हणून आता महावितरणे ग्राहकांना चार महिन्याचे बिल भरण्यासाठी तीन हप्त्यांची सवलत दिली आहे.
कोरोनामुळे मागील चार महिन्यापासून सर्वत्र उद्योगधंद ठप्प होते. त्यामुळे आर्थिक व्यवहारांवर सुध्दा याचा परिणाम झाला. अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.त्यातच महावितरणनेवीज ग्राहकांना चार महिन्याचे एकत्रीत बिल पाठविले.या बिलातील आकडे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ग्राहकांमध्ये यावरुन बराच संभ्रम सुध्दा निर्माण झाला. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून वाढीव वीज बिलाच्या मुद्दावरुन संताप व्यक्त केला जात आहे.
ग्राहकांची वीज बिलाबाबत ओरड वाढल्यानंतर आणि यासंबंधी तक्रारी वाढल्यानंतर महावितरणने यावर तोडगा काढला आहे. वीज ग्राहकांना चार महिन्याचे एकत्रित आलेले वीज बिल भरण्यासाठी आता ग्राहकांना तीन हप्त्यांची सवलत दिली जाणार आहे. यासाठी एकूण बिलाच्या रक्कमेच तीन हप्ते करुन जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यात ही रक्कम भरता येणार आहे.
एखाद्या वीज ग्राहकांने जून महिन्यात आलेल्या बिलाची रक्कम पूर्ण भरली असेल तर त्यांना दोन टक्के सूट दिली जाणार असून ही रक्कम पुढील महिन्याच्या वीज बिलात कपात केली जाणार आहे. शिवाय एखाद्या ग्राहकाला त्यांच्या विद्युत मीटर रिडिंगपेक्षा अतिरिक्त बिल आले असेल तर त्या सुध्दा दुरूस्ती करुन फरकाची रक्कम कमी करुन दिली जाणार आहे. विद्युत बिलात दुरुस्ती आणि वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना तीन हप्त्यांची सवलत देण्यासंदर्भात ऊर्जा मंत्रालयाकडून सुध्दा निर्देश प्राप्त झाले असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
मिस कॉलवर होणार समस्यांचे निराकारण
महावितरणने वीज ग्राहकांना चार महिन्याचे एकत्रित बिल दिल्यानंतर यावरुन ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही ग्राहकांना अतिरिक्त वीज बिल पाठविण्यात आले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी आता महावितरणने मिस कॉलचा तोडगा काढला आहे. ग्राहकांनी ९८३३५६७७७७, ९८३३७१७७७७ या क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर महावितरणचे कर्मचारी संबंधित ग्राहकांना फोन करुन त्यांच्या तक्रारी ऐकून घेवून त्यावर तोडगा काढणार आहेत. तसेच वीज बिलात काही त्रृटी असल्यास त्या सुध्दा दूर करणार आहेत.
पटेल यांनी केली होती अधिकाऱ्यांशी चर्चा
चार महिन्याच्या वाढीव वीज बिलावरुन वीज ग्राहकांमध्ये संताप आहे. संपूर्ण जिल्हाभरातून यासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारी आहेत. लोकप्रतिनिधीनींना सुध्दा यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या आहे. याचीच दखल खा. प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी (दि.६) विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची गोंदिया येथे बैठक घेवून चर्चा केली होती. तसेच ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यावर तीन हप्त्यांचा तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर आता या संबंधिचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.