गोंडमोहाळीचे सात सदस्य अपात्र
By Admin | Published: April 14, 2016 02:23 AM2016-04-14T02:23:27+5:302016-04-14T02:23:27+5:30
तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाळी ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह पाच सदस्यांना अपात्र ठरविण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिले.
हिशेबातील दिरंगाईचा फटका : जिल्हा प्रशासनाचे आदेश
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाळी ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह पाच सदस्यांना अपात्र ठरविण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिले. सर्व सदस्यांना आदेशाची प्रतही पाठविली.
मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ (१) ह अन्वये गोंडमोहाळी ग्राम पंचायतची सार्वत्रिक निवडणूक दि.२५/७/१५ रोजी झाली होती. दि.२७/७/१५ रोजी मतमोजणी करण्यात आली. दि.७/८/१५ ला सरपंच-उपसरपंचाची निवड झाली. यात पौर्णिमा सदनलाल वाडगाये सरपंचपदी व उपसरपंचपदी सुभाष बाबुराव कावडे यांची निवड झाली. पण सत्तेच्या गुर्मीत हिशेब देणे विसरले.
ग्राम अधिनियम १९५८ कलम १४ व नुसार खर्चाचा हिशेब देणे अनिवार्य आहे. मात्र या सदस्यांनी ४५ दिवस होऊनही निवडणुकीचा हिशेब दिला नाही.
याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व ग्राम पंचायत सदस्य जागेश्वर निमजे आणि इतर चार लोकांनी सरपंच पौर्णिमा वडगाये, उपसरपंच सुभाष कावडे, पुष्पा बोपचे, ममता बोपचे, प्रभा राऊत, धनवंता भगत, भूमेश्वर शेंडे यांच्याविरूद्ध याचिका अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या न्यायालयात दि.१०/८/१५ ला दाखल करण्यात आली होती. निकाल लागल्यानंतर ३० दिवसाच्या आत हिशेब देणे महाराष्ट्र शासन महसुल व वनविभागाचे शासन परीपत्रक दि.२९/३०२०१२ अन्वये बंधनकारक असताना त्यात हलगर्जीपणा झाल्याचे दिसून आले.
या सदस्यांनी दि.४/९/१५ रोजी हिशोब सादर केले. तहसीलदार तिरोडा यांच्याक्ून वस्तुस्थिती अहवाल मागविण्यात आला. यावर दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद वकीलामार्फत पाठविण्यात आला. दोन्ही पक्षाचे तोंडी, लेखी बमाल नोंदविण्यात आले. पण गैरअर्जदार ठोस पुरावे सादर करू शकले नाही. गैरअर्जदाराची अपील खारिज अमान्य करण्यात आली.
सरपंच, उपसरपंच पाच सदस्यांना सात महिन्यातच पायउतार व्हावे लागले. दुसरी याचिका सुद्धा अतिक्रमणाची टाकण्यात आली असल्याचे सामाजिक कार्यकर्ता जागेश्वर निमजे यांनी लोकमतला सांगितले आहे.
प्राप्त माहितीनुसार गावातील नागरिकांनी हे प्रकरण घडण्यामागचे सत्य वस्तुस्थिती जाणऊन घेण्यासाठी ज्याला काही घेणेदेणे नाही त्यांना चर्चेदरम्यान विचारले असता त्या नागरिकांनी सांगितले की, गावाच्या राजकारणात बाहेवरील माणुस हस्तक्षेप जास्त करीत आहे.
गावात सामाजिक भावना न ठेवता, विकासाची बाजु न मांडता बदल्याची भावना ठेऊन काम करीत आहे. त्यांना कामाची जाणीव नाही, सत्तापक्षाला चुकीचे मार्गदर्शन करणे हेच अंगावर आले व विरूद्ध पार्टीचे लोक नियमाचे भान ठेऊन कार्य करीत असल्याने सत्तापक्षाला अडकवत आहेत. पण आपले नाव लिहू नये या अटीवर त्यांनी गावांची आपबीती सांगितली. लोकमतने अगोदर हे प्रकरण उचलून धरले व त्यांना न्याय ही मिळाला.