निकृष्ट तांदळामुळे सात राईस मिल काळ्या यादीत, राईस मिलर्सची कोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 11:29 AM2023-06-30T11:29:50+5:302023-06-30T11:30:14+5:30
तीन वर्ष शासकीय धानाची भरडाई करता येणार नाही : भरारी पथकाच्या तपासणीत आले उघडकीस
गोंदिया : केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील राईस मिलच्या केलेल्या तपासणीत देवरी तालुक्यातील सात राईस मिलमध्ये भरडाई केलेला तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा आढळला. हा तांदूळ खाण्यायोग्य नसल्याचे सांगत या तांदळाचे लाट रद्द करून या सातही राईस मिलला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. या कारवाईमुळे राईस मिलर्समध्ये खळबळ उडाली आहे.
गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने गोंदिया जिल्ह्यात खरेदी केलेल्या शासकीय धान्याची राईस मिलर्ससह करार करून भरडाई केली जाते. यासाठी देवरी तालुक्यातील वसंत राईस मिल डोंगरगाव, तिरुपती राईस मिल देवरी, महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्री चिचगड, माॅ भगवती राईस इंडस्ट्री देवरी, इंडियन फूड प्रॉडक्ट चिचगड, बालाजी राईस मिल बोरगाव बाजार व माँ शक्ती राईस इंडस्ट्री देवरी यांच्याशी धान्य भरडाईचा करार केला होता. भरडाई केलेला तांदूळ देवरी तालुक्यात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने भाड्याने घेतलेल्या आशू गोदामात एप्रिल २०२२ मध्ये जमा केला होता. त्यावेळी तांदूळ गुणवत्ता अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सतीश अगडे यांनी या सातही राईस मिलर्सने जमा केलेला २७ लॉट तांदळाची गुणवत्ता तपासून तांदूळ जमा केला होता. मात्र ७ मे रोजी आशू गोदामात तांदूळ तपासणीकरिता आलेल्या केंद्रीय पथकाने हा तांदूळ मानवी खाण्यास योग्य नसल्याचे सांगत या तांदळाचे लाॅॅट रद्द करीत सातही राईस मिलर्सला तीन वर्षाकरिता शासकीय धान्याची भरडाई करता धान्य देऊ नये असे निर्देश दिले. या राईस मिलला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे जिल्हाधिकरी चिन्मय गोतमारे लोकमतशी बोलताना सांगितले.
गुणवत्ता अधिकाऱ्याच्या तपासणीवर प्रश्न चिन्ह
जिल्हा पुरवठा कार्यालयाने देवरी तालुक्यात एप्रिल २०२२ ला नियुक्त केलेले तांदूळ गुणवत्ता अधिकारी सतीश अगडे यांनी तांदळाची गुणवत्ता तपासून सातही राईस मिलर्सचा तांदूळ गोदामात जमा करून घेतला होता. दुसरीकडे याच तांदळाला केंद्रीय पथकाने मानवी खाण्यास हा तांदूळ योग्य नसल्याचे सांगत कोट्यवधी रुपयांच्या तांदळाचे २७ लॉट रद्द केले आहे. या सातही राईस मिलर्सकडून नवीन तांदूळ जमा करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राईस मिलर्सची न्यायालयात धाव
तत्कालीन तांदूळ गुणवत्ता अधिकारी सतीश अगडे यांनी तांदूळ जमा करताना खरंच हा तांदूळ कुठल्या पद्धतीने तपासून घेतला होता. आधी गुणवत्ता अधिकारी उत्कृष्ट असलेला तांदूळ आता निकृष्ट करून रद्द कसा केला. त्यामुळे गुणवत्ता अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर राईस मिलर्सने प्रश्न उपस्थित करीत याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय निर्णय होतो याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय पथक म्हणते तांदूळ खाण्या योग्य नाही
जिल्ह्यातील धान खरेदीचा घोळ गाजत आहेत. त्यातच आता केंद्रीय पथकाने राईस मिलर्सने शासकीय गोदामात जमा केलेला तांदूळ निकृष्ट दर्जाचा व मानवास खाण्यायोग्य नसल्याचा ठपका ठेवत तांदळाचे लाट रद्द केले. पुन्हा एकदा शासकीय धान भरडाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.