सात गावे तलाठ्याविना
By admin | Published: December 27, 2015 02:18 AM2015-12-27T02:18:28+5:302015-12-27T02:18:28+5:30
तिरोडा तालुक्यातील साझा-६ मध्ये तीन वर्षांपासून तलाठ्याचे पद रिक्त पडून आहे. या साज्याला कायमस्वरुपी तलाठी मिळत नसल्यामुळे
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील साझा-६ मध्ये तीन वर्षांपासून तलाठ्याचे पद रिक्त पडून आहे. या साज्याला कायमस्वरुपी तलाठी मिळत नसल्यामुळे त्याचे खापर दुसऱ्या साज्यातील तलाठ्यावर फोडले जात आहे. यामुळे सात गावांमधील नागरिकांची कामे रखडत आहे.
तलाठी म्हणजे गावाचे तहसीलदार असतात. गावातील विविध कामांसह सात-बारा, रहिवासी दाखला, जप्त प्रमाणपत्रांसह अन्य प्रमाणपत्र कागदपत्रांसाठी तलाठ्यांशी खास संबंध येतो. परंतु येथील तलाठ्याचे पद मागील तीन वर्षांपासून रिक्त असल्याने दुसऱ्या साज्यातील महिला तलाठ्याकडे प्रभार देण्यात आला आहे.
संबंधित तलाठी प्रभारी असल्याने तेथील नागरिकांची कामे रखडत चालली आहेत. साझा-६ मध्ये सर्व गावे वैनगंगा नदी काठावर असून अतिसंवेदनशील असल्याने महिला तलाठीला तारेवरची कसरत करावी लागते. मुख्य कार्यालय परसवाडा असून गोंडमोहाळी, किंडगीपार ही मोठी गावे आहेत. तर अतिरिक्त कार्यभार चांदोरी खुर्द, खैरलांजी, पिपरीया, बिहिरीया या गावांचा आहे. महिला तलाठी असल्याने गावाचा दौरा करणे, मौका चौकशी पंचनामा करणे कठीण होते. सात गावातील शेतकऱ्यांना आपली कामे करण्यासाठी स्पर्धा करावी लागते. खैरलांज़ी साझा-६ ला कायमस्वरुपी तलाठी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)