हुंड्यासाठी छळणाऱ्या पतीला सात वर्षांची शिक्षा
By admin | Published: December 9, 2015 02:12 AM2015-12-09T02:12:40+5:302015-12-09T02:12:40+5:30
पैश्यासाठी पत्नीचा वारंवार छळ करणाऱ्या पतीवर आठ महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
अखेर मिळाला मृत परिचारिकेला न्याय
गोंदिया : पैश्यासाठी पत्नीचा वारंवार छळ करणाऱ्या पतीवर आठ महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्या पतीला सात वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
चिचगडच्या ग्रामीण रूग्णालयात कार्यरत असणारी प्रियंका नामदेवराव उभाळे (२४) या परिचारीकेचा ३ जून २००६ च्या पहाटे मृत्यू झाला. तिचा पती आरोपी राजेश वासुदेवराव लोणारे (३०) रा. नवप्रभातनगर यवतमाळ हा तिचा पैश्यासाठी छळ करायचा. ती आपल्या खोलेत मृतावस्थेत आढळल्याने या संदर्भात तेथील डॉक्टर प्रफुल्ल विठ्ठलराव मेश्राम यांनी या मृत्यूला संशयास्पद असल्याचे सांगून पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल लोखंडे यांनी केला. या प्रकरणातील पुरावे गोळा करून त्याच्याविरूधञद दोषारोप दाखल करण्यात आले. तिला हुंडा कमी दिला म्हणून आरोपी तिचा छळ करायचा. तिच्या पतीने तिला टेंशन दिल्याने झटके येऊन तिचा मृत्यू झाला.
या संदर्भात घटनेच्या आठ महिन्यानंतर ३ फेबु्रुबारी २००७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावर शुक्रवारी अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय प्रथम येथे सुनावणी झाली. न्यायाधीश एस.आर. त्रिवेदी यांनी कलम ४९८ अ मध्ये २ वर्षाची शिक्षा व २ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिन्याची शिक्षा, कलम ३०४ (ब) अन्वये सात वर्षाची शिक्षा व ५ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिन्याची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. विणा बाजपेयी यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाज पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रभारी महेश महाले यांच्या नेतृत्वात हवालदार मनोज फुलसुंगे व महिला शिपाई आशा मेश्राम यांनी काम पाहिले.(तालुका प्रतिनिधी)