बलात्कारप्रकरणी सात वर्षाची शिक्षा
By admin | Published: September 13, 2014 01:59 AM2014-09-13T01:59:14+5:302014-09-13T01:59:14+5:30
तेंदूपत्ता तोडून घरी परतलेल्या ईस्तारी येथील ३५ वर्षाच्या महिलेवर गडचिरोली जिल्ह्यातील ४५ वर्षाच्या एका इसमाने बलात्कार केला होता.
गोंदिया : तेंदूपत्ता तोडून घरी परतलेल्या ईस्तारी येथील ३५ वर्षाच्या महिलेवर गडचिरोली जिल्ह्यातील ४५ वर्षाच्या एका इसमाने बलात्कार केला होता. या प्रकरणातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी सात वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
भाऊदास केवलराम सहारे (४५) रा. कारूटोला तालुका कोरची जि. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे. इस्तारी येथील ३५ वर्षाची महिला १८ मे २०११ रोजी सकाळी ७ वाजता दरम्यान तेंदूपत्ता तोडण्यासाठी मुलगा, वडील यांच्या सोबत जंगलात गेली होती. जंगलातून घरी परतल्यावर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी एक अनोळखी इसम आला. त्याने पिण्याचे पाणी मागितले. त्याच्यासाठी पाणी आणण्यासाठी ती महिला घरात गेली असता आरोपी तिच्या मागे-मागे घरात गेला. तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न करीत असताना ती ओरडली. त्यावर तिचा मुलगा मदतीसाठी धावला. मात्र आरोपी भाऊदास सहारे हा पीडित महिलेच्या मुलाला मारण्यासाठी धावल्याने तो मुलगा पळाला. त्यानंतर आरोपीने त्या महिलेला तणशीच्या ढिगात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घराबाहेर पळालेल्या तिच्या मुलाने शेजाऱ्यांना बोलावून आणले. तेव्हापर्यंत आरोपीने त्या महिलेची आब्रु लुटली होती. गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची साक्ष पीडित महिलेचा मुलगा व गावकऱ्यांनी दिली. या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश गिरटकर यांनी बुधवारी सुनावणी केली. या प्रकरणातील आरोपी भाऊदास सहारे याला कलम ३७६ नुसार चार वर्षाची शिक्षा व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, कलम ५०६ नुसार ३ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी वकील अॅण्ड. कैलास खंडेलवाल यांनी काम पाहिले.
या प्रकरणातील पीडित महिलेने घटनेच्या १७ दिवसानंतर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली. (तालुका प्रतिनिधी)