नगर पंचायतीच्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 02:03 AM2019-08-04T02:03:07+5:302019-08-04T02:03:15+5:30
शासनाच्या दुजाभावामुळे शिक्षकांमध्ये रोष व्याप्त होता
गोंदिया : राज्य सरकारने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला होता. मात्र यातून नगर परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले होते. शासनाच्या दुजाभावामुळे शिक्षकांमध्ये रोष व्याप्त होता. दरम्यान राज्य सरकारने शुक्रवारी नगर परिषद
व नगर पंचायत अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा लाभ राज्यभरातील १६ हजार शिक्षकांना होणार आहे.
शिक्षक सहकार संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जुलै रोजी भेट घेऊन नगर परिषदे अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांबाबतचा दुजाभाव दूर करुन सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. तसेच यासाठी सातत्याने पाठपुरवा सुरू ठेवला होता. त्याची दखल शासनाने २ आॅगस्ट २०१९ रोजी नगर परिषद, नगर पंचायत अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.