पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या
By admin | Published: March 9, 2017 12:41 AM2017-03-09T00:41:39+5:302017-03-09T00:41:39+5:30
पंचायत समिती सडक अर्जुनी व कन्हारपायली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पातरगोटा येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष : पातरगोटा येथे बोअरवेलची मागणी
शेंडा (कोयलारी) : पंचायत समिती सडक अर्जुनी व कन्हारपायली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पातरगोटा येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. याची माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्याला गावकऱ्यांच्या सह्यानिशी लेखी निवेदनातून देण्यात आली. मात्र त्याची दखल आजपावेतो घेण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
कन्हारपायली पासून २ किमी अंतरावर असलेल्या पातरगोटा येथे ३० ते ३५ घरांचे आदिवासी समाजाचे लोक पिढ्यानपिढ्यापासून वास्तव्यास आहेत. पातरगोटा हे गाव आदिवासीबहुल असून अतिदुर्गम नक्षल क्षेत्रात मोडते. त्या गावात फक्त एकच बोअरवेल आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. एक किमी अंतरावरुन शेतातील विहिरींचे पाणी आणूण तहान भागवावी लागते. पाणी समस्या दूर करण्यासाठी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व ग्रामपंचायतकडे वारंवार कैफियत मांडली, तरीही दुर्लक्ष करण्यात आले.
पिण्याचे पाणी, रस्ते व वीज या मानवाच्या मुलभूत गरजा असून त्याची पूर्तता करणे प्रशासनाचे आद्यकर्तव्य आहे. असे असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते, ही शोकांतिका आहे. अखेर गावकऱ्यांनी या क्षेत्राचे जि.प. सदस्य सरिता कापगते यांना निवेदन देऊन पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली. यावर त्यांनी तातडीने पातरगोटा गावाला भेट देवून पाणी समस्या जाणून घेतली व लवकरच बोअरवेलची मागणी करुन पाणी समस्या दूर केल्या जाईल, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले. (वार्ताहर)