पाण्याची भीषण टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:42 PM2018-05-04T23:42:52+5:302018-05-04T23:42:52+5:30
ग्रामपंचायत पळसगाव येथे पाण्याची भीषण समस्या कायम असून दोन ट्रँकरने पाणी पुरवठा करण्याचे काम चालू आहे. गावातील बोअरवेल दुरूस्तीकडे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : ग्रामपंचायत पळसगाव येथे पाण्याची भीषण समस्या कायम असून दोन ट्रँकरने पाणी पुरवठा करण्याचे काम चालू आहे. गावातील बोअरवेल दुरूस्तीकडे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
सरपंच भुमेश्वर पटले, उपसरपंच हिरालाल चवारे व तंमुस अध्यक्ष धानुलाल रंगारी यांनी पुढाकार घेवून गावातील १८ बोअरवेल्सपैकी त्याच ग्रामपंचायतच्या वामन कोकोडे यांची सहायता घेवून चार बोअरवेल्सच्या पाईप लाईनचे काम करुन ग्रामपंचायतने स्वखर्चाने पाईप लाईन वाढवून दुरुस्ती केली. त्यात पंचायत समितीमार्फत काहीच काळजी घेण्यात आली नाही. पंचायत समितीच्या अभियांत्रिकी विभागाचे खोटेले यांना १५ दिवसांपासून फोन करुनसुद्धा बोअरवेल दुरुस्त करण्यात आली नाही.
पाणी पुरवठ्याची विहीर कोरडी पडली आहे. पाईप लाईनसुद्धा काही जागी निकामी झालेली आहे. यावर उपाय म्हणून अंताराम मेश्राम यांच्या घराजवळील बोअरवेलवर समर्सिबल मोटार ग्रामपंचायतमार्फत लावून ते पाणी ढोल्यात घालण्याचे नियोजन करण्यात आले. गावात पाईप लाईन दुरुस्त करुन समस्या दूर करण्याच्या कामी ग्रामपंचायतचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यांना गावातील सेवकराम बागडे, शंकरलाल अग्रवाल, हिरामन तुमळाम, रमेश जांभुळकर, सुलभ रंगारी, रामचरण राऊत, वामन कोकोडे, राजाराम मेश्राम, जिवतू राऊत, लेखराम राऊत, हेमा राऊत, अंताराम मेश्राम, शोभीलाल चौधरी आदी ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत. गावातील मोठ्या संख्येने लोकांनी कामाला सुरुवात केली असून पाणी समस्याला तोंड देण्याचा पळसगाववासीयांनी निर्धार केलेला आहे.
हे सर्व करण्याची धुरा सरपंच बी.एम. पटले, उपसरपंच हिरालाल चवारे यांनी सांभाळली आहे. आचार संहिता असल्याने लोकप्रतीनिधी यावर निधी उपलब्ध करुन देऊ शकत नाही. यावर आ. परिणय फुके यांना फोन केले असता आचार संहितेनंतर मदत करू, असे सांगितले. पण ना. राजकुमार बडोले यांच्याकडून एक बोअरवेल तयार होणार असल्याचे सरपंच बी.एम. पटले यांनी सांगितले.