अभ्यास परीक्षेविनाच मिळाली शाब्बासकीची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 05:00 AM2021-07-17T05:00:00+5:302021-07-17T05:00:02+5:30
दहावीच्या निकालात यंदा नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात यंदा सुधारणा झाली आहे. यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारली असून, ९९.९३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ९९.९१ टक्के मुुलगे उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा एकूण निकाल ९९.९२ टक्के लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. १६) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९९.९२ टक्के लागला असून, नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. दहावीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून, ९९.९३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून, रिझल्टमध्ये गर्ल्स रॉक्स ठरल्या आहेत.
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यातच दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच नववीचे गुण आणि वर्षभराचे अंतर्गत मूल्यमापन या आधारावर दहावीचा निकाल घोषित करण्यात आला. सरसकट सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले.
यंदाचा निकाल कसा जाहीर होणार, याकडे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, यंदाच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये फारसा उत्साह नव्हता.
निकाल पाहण्याचे संकेतस्थळ बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा शुक्रवारी हिरमोड झाला. दहावीच्या निकालात यंदा नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात यंदा सुधारणा झाली आहे.
यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारली असून, ९९.९३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ९९.९१ टक्के मुुलगे उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा एकूण निकाल ९९.९२ टक्के लागला आहे.
दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण १९ हजार २७४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९ हजार २६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९,९६२ विद्यार्थी, तर ९,२९८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. ६,६६१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ९,७५६, तर व्दितीय श्रेणीत २,८६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
जिल्ह्याचा एकूण निकाल ९९.९२ टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकालात ४.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सावित्रीच्या लेकींनी मारली बाजी
- दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. दहावीच्या परीक्षेत ९,९६२ विद्यार्थी, तर ९,२९८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.९१ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.९३ टक्के आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत सावित्रीच्या लेकीच सरस ठरल्या.
सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के
- यंदा कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने बोर्डाने ठरवून दिलेल्या निकषानुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे बहुतेक शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे.
आता पालकांचे लक्ष मिशन अॅडमिशनकडे
- दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या पाल्याला त्याच्या आवडत्या शाखेत प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची धडपड सुरू होते. त्यामुळे निकालानंतर पालक विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरू होते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रवेशाची प्रक्रियासुध्दा ऑनलाईन राबविली जाण्याची शक्यता आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची निराशा
- परीक्षा न घेता यंदा प्रथमच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात सर्वच विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात आले. त्यामुळे गुणवंत व अभ्यासू विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाली आहे. शाळेतूनच नव्हे तर जिल्हा आणि विभागातूून अव्वल येण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेतली. मात्र, परीक्षाच रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. या निकालाने अव्हरेज विद्यार्थ्यांना मात्र त्यांच्यात अभ्यास न करताच पास झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळाळत होता.
वेबसाईट क्रॅकने विद्यार्थी आणि शिक्षण विभागाचा हिरमोड
- शुक्रवारी (दि. १६) दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकालाची साईट दिवसभर उघडलीच नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची निराशा झाली. याचा फटका शिक्षण विभागाला बसल्याने ऑनलाईन शिक्षण देण्याची भाषा करणाऱ्या शिक्षण विभागाला ऑनलाईन निकाल देण्याची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.