११ हजार हेक्टरवर दुष्काळाची छाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:00 PM2017-11-13T22:00:14+5:302017-11-13T22:00:57+5:30

तालुक्यात १५ हजार हेक्टरवर खरीपात धानपिकाची लागवड करण्यात आली. मात्र कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे यापैकी ११ हजार हेक्टरमधील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत.

Shadow of drought on 11 thousand hectares | ११ हजार हेक्टरवर दुष्काळाची छाया

११ हजार हेक्टरवर दुष्काळाची छाया

Next
ठळक मुद्देपिकांवरील रोगांमुळे शेतकरी हैराण : शासनाच्या घोषणेकडे लक्ष

विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यात १५ हजार हेक्टरवर खरीपात धानपिकाची लागवड करण्यात आली. मात्र कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे यापैकी ११ हजार हेक्टरमधील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली असून शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
तालुक्यात एकूण १७ हजार ७३९ हेक्टर क्षेत्र लागवडयोग्य आहे. त्यापैकी १५ हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धानाची शेती केली जाते. याच पिकावर या परिसरातील शेतकºयांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो. शेतीशिवाय या तालुक्याला अर्थाजन करण्याचे कोणतेही दुसरे माध्यम नाही. मात्र यंदा कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे ११ हजार हेक्टरमधील धानाची अक्षरश: तणस झाली आहे. त्यामुळे ऐवढ्या क्षेत्रावर शुन्य उत्पादनाची शक्यता वर्तविली जात आहे.
यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासून पावसाने दगा दिला. त्यामुळे धानाची पेरणी आणि रोवणी वेळेवर होऊ शकली नाही. ऐन रोवणीच्या कालावधीत पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे केवळ नैसर्गिक पावसावर अवलंबून असलेल्या शेतकºयांना रोवणी करता आली नाही. तालुक्यातील तीन सर्कलचा विचार केला तर कावराबांध परिसरात ९० टक्के रोवणी झाली. परंतु सालेकसा व साखरीटोला सर्कलमधील एकंदरीत ३५ ते ४० टक्के क्षेत्रावर रोवणी झाली नाही. ३० टक्के क्षेत्र पडीक राहिले. कावराबांध सर्कलमध्ये रोवणीची कामे ९० टक्के झाली मात्र पीक आल्यावर शेवटच्या क्षणी ऐन कापणीच्या १५ दिवसांपूर्वी मावा, तुडतुडा आणि खोडकीडा आदी कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. परिणामी पिकांचे ५० टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. जवळपास साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावरील धानपीक कीडरोगांमुळे नष्ट झाले. सुरुवातीला ५ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र पावसाअभावी पडीक राहिले. त्यामुळे यातून कुठलेच उत्पादन होणार नाही. एकंदरीत कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे सालेकसा तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे.
अकरा हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर काहीच उत्पादन होणार नसल्याने वर्षभर कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचा कसा आणि सावरकार, बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करायची याच चिंतेत शेतकरी आहेत. पावसाअभावी ३० टक्के शेतकºयांना रोवणीच करता आली नाही. त्यामुळे त्यांचा लागवड खर्च सुध्दा निघणार नसल्याचे चित्र आहे. पेरणीपासून रोवणीपर्यंत लागणारा खर्च, खत, औषध तसेच मजुरीचा खर्च नांगरणी खर्च आदीचा विचार केल्यास शेतकºयांच्या हाती काहीच लागणार नसून उलट कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील पिकांची स्थिती लक्षात घेता शासनाने सालेकसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
लोकप्रतिनिधी लक्ष देणार का?
नुकतेच जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदाराने काही गावांना भेट देऊन पिकांची पाहणी केली. याच दरम्यान जिल्ह्यातील तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला. मात्र यामध्ये सालेकसा तालुक्याचा समावेश नव्हता. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी याचा पाठपुरावा करुन शेतकºयांना मदत मिळवून देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शेतकरी, शेतमजूर रोजगाराच्या शोधात
यंदा पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. केलेला लागवड खर्चसुध्दा भरुन निघण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकºयांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा, यासाठी तालुक्यातील अनेक शेतकरी, शेतमजूर रोजगाराच्या शोधात शहराकडे पलायन करीत असल्याचे चित्र आहे.
शेतकºयांनी मांडल्या व्यथा
तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधीने तालुक्यातील अनेक गावात संपर्क अभियान राबवून शेतकºयांशी थेट संवाद साधला. यावेळी अनेक शेतकºयांनी प्रत्यक्षात शेती दाखवत आपली व्यथा मांडली. आधी पावसाने आणि आता कीडरोगांमुळे शेतकºयांच्या हाती केवळ तणसच येणार असल्याचे सांगितले. तालुक्यातील बिंझली, कावराबांध, झालीया, कोटजमुरा, नवेगाव, बाम्हणी, खेडेपार, खोलगड, पानगाव, दरबडा, धानोली, सातगाव, तिरखेडी, गिरोला, बोदलबोडीसह अनेक गावांत प्रत्यक्ष भेट देऊन धानपिकांची पाहणी केली. त्यात अनेक गावांमध्ये अतिशय बिकट स्थिती आढळली.

ज्या शेतात सरासरी २५० पोती धान उत्पादन होत होते, त्या शेतात यंदा जेमतेम पाच पोती धानाचे उत्पादन झाले. ते देखील खाण्यायोग्य नाही. जनावरांचा चारा म्हणून तणससुध्दा उपयोगाची नाही. त्यामुळे जनावरांच्या चाºयाचा सुध्दा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
- पुल्लुलाल दमाहे, नवेगाव (शेतकरी)

दरवर्षी येणाºया नैसर्गिक संकटामुळे शेतकºयांची अवस्था बिकट झाली आहे. यंदा तर शेतीतून काहीच उत्पन्न हाती येण्याची शक्यता नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हीच चिंता आतापासून सतावत आहे.
- झनकलाल नागपुरे (शेतकरी)

Web Title: Shadow of drought on 11 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.