वटवृक्षाच्या छायेत निनाद राष्ट्रगीताचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:00 AM2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:14+5:30
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खर्रा ही ९३ पटसंख्या असलेली ही शाळा. बघताच क्षणी कुणालाही आवडेल असे या शाळेचे देखणे रूप आहे. मोठ्या वडाच्या झाडा सोबतच अजूनही दोन-चार गर्द झाडाच्या सावलीत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरविले जातात. शाळेचा परिसर स्वच्छ निटनेटका सर्वत्र गट्टू लावलेले, कचरा नाही, अस्वच्छता कुठेच दिसत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत भानपूरा केंद्रातील मुख्य रस्त्यापासून ८-१० किलामीटर अंतरावर खर्रा नावाचे छोटेसे गाव आहे. गाव ओलांडून पलीकडे गेले की समोर दिसते ते विस्तीर्ण वडाचे झाड आणि या झाडाखाली असतात परिपाठाचे लयीत गुंजनारे विद्यार्थ्यांचे स्वर. हे स्वर राष्ट्रगीताचा निनाद करतात.
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खर्रा ही ९३ पटसंख्या असलेली ही शाळा. बघताच क्षणी कुणालाही आवडेल असे या शाळेचे देखणे रूप आहे. मोठ्या वडाच्या झाडा सोबतच अजूनही दोन-चार गर्द झाडाच्या सावलीत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरविले जातात.
शाळेचा परिसर स्वच्छ निटनेटका सर्वत्र गट्टू लावलेले, कचरा नाही, अस्वच्छता कुठेच दिसत नाही. शाळेच्या संरक्षक भिंत तसेच संपूर्ण शाळा विचार पूर्वक रंगविलेली आहे. सुंदरते सोबतच त्यामध्ये शैक्षणिक बाबींचाही विचार केलेला दिसतो.
शाळेच्या परिपाठापासूनच शाळेच्या गुणवत्तेची चुणूक दिसायला लागते. इंग्रजी, हिंदी व मराठी मध्ये चालणारा हा परिपाठ संपूर्ण गावाला ऐकू जाईल अशा लाऊडस्पीकरच्या आवाजात तालबद्ध पद्धतीने सुरू असतो. नेहमीच्या परिपाठासोबतच सामान्य ज्ञानाचे विचारले जाणारे प्रश्न (क्वॅचन बँक), वाढदिवस साजरा करण्याची पद्धत, प्रत्येकच गोष्टीत नावीन्य आढळून येते. या सर्व गोष्टीत हिरीरिने सहभागी होणारे विद्यार्थी बघितले की शिक्षक विद्यार्थ्यांसाठी घेत असलेले श्रम दिसून येते.
या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी बैरागीटोला, केद्यूटोला, ओझाटोला, फत्तेपूरटोला व खर्रा या ५ गावांतील आहेत. त्यात २३ विद्यार्थी मूळ खर्रा गावातील असून उर्वरीत ६९ मुले शेजारच्या ४-५ किलोमीटर टोल्यावरून नियमित येतात. पाऊस, थंडी, ऊन्ह असले तरी शाळेची उपस्थिती १०० टक्के राहते. सन २०१७ मध्ये मुख्याध्यापक एम.एस. पडोळे रूजू झाले.
त्यांच्यानंतर एन. एन. गौतम, टी. टी. पारधी आणि आर.सी. चौधरी हे त्यांचे सहकारी पण बदलीने रूजू झालेत.
या सर्वांनी मिळून ठरविले की शाळेचे परिवर्तन घडून आणायचे शाळेचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय मनाशी ठेवून हे चारही शिक्षक कामाला लागले. श्रम, धन, बुध्दी, चातुर्य व सहकार्य या पंचसूत्रीचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रगतीसाठी नियोजन पूर्वक काम करून केवळ दीड वर्षात मध्ये शाळेचा कायापालट केला.
९० टक्के अनुसूचीत जमातीचे मुले
या शाळेत अनुसूचित जमातीचे ९० टक्के मुले आहेत. या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षकांनी मागच्या सत्रात करून घेतलेल्या तयारीने शासकीय विद्या निकेतन केलापूर येथे दोन विद्यार्थ्यांची निवड झाली. शिष्यवृत्ती परीक्षेत ११ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यापैकी सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत.
शाळेत प्रोजेक्टर व लॅपटॉपची सोय
शाळेच्या दिडवर्षातील हा प्रवास गवकऱ्यांसाठी पण कौतुकाचा विषय आहे. त्यामुळे आता गावकरी सुधा शाळेबाबत सहकार्याच्या भूमिकेत असतात. शिक्षक जे-जे सांगतील ते-ते करण्याची त्यांची तयारी आहे. गावाला १४ वित्त आयोगातून प्रोजेक्टर व लॅपटॉप मिळाला आहे. समाज सहभागातून शुद्ध पाण्याची व्यवस्था व गट्टू लावून देण्यात आले आहेत. शाळेची रंगरंगोटी दोन संगणक शिक्षकांनी स्वत: पैसे खर्च करून उपलब्ध करून दिली आहे.
क्रीडा स्पर्धांमध्येही शाळा अग्रेसर
या शाळेतील विद्यार्थी क्रीडा व कला क्षेत्रातही अग्रेसर आहेत. चित्रकला, क्रीडा स्पर्धा, लेझीम मानवी मनोरे या प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहे. शिक्षक चौधरी हे संगीत विशारद आहेत. त्यामुळे मुले गायन, वादन, नृत्य, नाट्य, इत्यादी कलेत सुध्दा निपून आहेत. या सोबतच आधुनिक भारताचे नागरिक असणाºया विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली आहे. विद्यार्थी स्वत: संगणकावर अभ्यासक्रमाच्या कठीण संकल्पना संगणकाच्या माध्यमातून समजावून घेतात. फावल्या वेळात सामान्यज्ञानावर आधारित अनेक गोष्टी विद्यार्थी शोधत असतात.
९५ टक्के विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट वाचन
मुलांची इयत्तानुरूप गुणवत्ता देखील प्रशंसनीय आहे. ९५ टक्के विद्यार्थी इयत्तानुरूप उत्कृष्ट वाचन व लेखन करतात. गणीतीय क्रिया करणारे ९० टक्के आहेत. ईयत्ता दुसरीचे विद्यार्थी गणीतीय कथा तयार करताना दिसून येतात.
सात वर्गासाठी चारच शिक्षक आहेत. अनुकूल परिस्थीती नसतांनाही समस्यांवर रडत बसण्यापेक्षा त्या समस्यांना आव्हाण समजून हसत-हसत समस्यांवर मात करण्याचा विडा त्या शिक्षकांनी उचलला. त्यानुसार त्यांची वाटचाल सुरू आहे.
डॉ. किरण धांडे
वरिष्ठ अधिव्याख्याता
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया.