शहीद जान्या-तिम्या शाळा आंतरराष्ट्रीय ओजस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:40 AM2018-04-07T00:40:41+5:302018-04-07T00:40:52+5:30
विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शासकीय शाळांना आता चांगले दिवस येऊ लागले. मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग,...
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शासकीय शाळांना आता चांगले दिवस येऊ लागले. मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व शालेय शिक्षण विभागाच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथील शहीद जान्या-तिम्या जि.प.उच्च प्राथमिक शाळा व चंद्रपूर जिल्ह्याची चिंचाळा येथील जि.प. शाळेची ओजस आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्याच्या पहिल्या टप्यात १३ शाळांची ओजस म्हणून निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय शाळांना महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय कक्षातून मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे. एक ओजस आंतरराष्ट्रीय शाळा आपल्या परिसरात इतर नऊ शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्यात सहकार्य करेल. त्या शाळांना तेजस आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून ओळखले जाईल. गोंदिया जिल्ह्यातील निवड करण्यात आलेली शहीद जान्या-तिम्या ओजस शाळेचा दौरा राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केला आहे. प्रधान सचिवांनी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक व नागरिकांचीबैठक घेऊन त्यांना ओजस शाळेसंदर्भात मार्गदर्शन केले आहे.
यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून सुरूवात
ओजस आंतरराष्ट्रीय शाळेची सुरूवात यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून होणार आहे. पाठ्यक्रम राज्य शिक्षण बोर्डाचेच राहील. नर्सरी पासून प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय शाळेसाठी गुणवंत शिक्षकांची निवड केली जाणार आहे. बालकांच्या सर्वांगीण बौद्धीक, शारीरिक व शैक्षणिक स्तर उंचावण्यात येणार आहे. बालकांना आवड असलेल्या क्षेत्रानुसार त्यांना वाव दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय शाळेसाठी विद्यार्थ्यांची संख्या निश्चीत करण्यात आली आहे. ओजस शाळा कोणत्याही आंतरराष्ट्रीय शाळा किंवा कॉन्व्हेंटपेक्षा उत्तम राहील.
सहा शाळा होत्या स्पर्धेत
आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील सहा शाळा स्पर्धेत होत्या. त्यात आमगावची जि. प. हायस्कूल, गोरेगाव हिरडामालीची जि. प. उच्च प्राथमिक शाळा, शहीद जान्या-तिम्या जि. प. हायस्कूल, तिरोडाची जि. प. हायस्कूल, सडक-अर्जुनी तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा बकी, देवरीची जि.प.हायस्कूल या शाळांची पुणे येथे आयोजित कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली होती. यात गोरेगावची शहीद जान्या-तिम्या जि.प.हायस्कूलची निवड करण्यात आली. उर्वरीत ५ शाळांपैकी २ शाळांची तेजस शाळा म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.
सरकारतर्फे राज्यात शंभर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा तयार केल्या जात आहेत. या शाळांत भौतिक, शैक्षणिक व मूलभूत सोयी सुविधा राहतील. गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्यात ओजस शाळा निर्मितीमुळे शासकीय शाळांमध्ये स्पर्धा निर्माण होईल. एक ओजस शाळेच्या अधिन नऊ तेजस शाळा राहणार आहेत. जिल्ह्यात जास्तीत-जास्त तेजस शाळा तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- राजकुमार हिवारे प्राचार्य,
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,