शंकरपटाला पुनरूज्जीवन मिळणार
By admin | Published: January 10, 2016 01:54 AM2016-01-10T01:54:54+5:302016-01-10T01:56:20+5:30
जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यांमध्ये वर्षानुवर्षापासून चालत आलेली शंकरपटांची (बैलगाड्यांची शर्यत) ...
बंदी उठविण्याचे स्वागत : जिल्ह्यात अनेक वर्षांपासूनची परंपरा पुन्हा जपण्याची संधी
सडक-अर्जुनी/अर्जुनी मोरगाव : जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यांमध्ये वर्षानुवर्षापासून चालत आलेली शंकरपटांची (बैलगाड्यांची शर्यत) परंपरा पटावरील बंदीनंतर खंडित झाली होती. मात्र शुक्रवारी या पटांवरील बंदी न्यायालयाने सशर्त उठविल्याने या निर्णयाचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत होत आहे. विशेषत: सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यात शंकरपटाच्या शौकिनांनी पुन्हा नवीन उत्साहाने शंकरपटांचे आयोजन करण्याचा मनोदयही ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
शंकरपटांच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यात मोठी उलाढाल होत होती. काही गावांमध्ये तर लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जात होती. सडक अर्जुनी तालुक्यातील सडक अर्जुनी, सौंदड, वडेगाव, डव्वा, पांढरी, खोडशिवनी येथील शंकरपट विशेष प्रसिद्ध होते. याशिवाय अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोरगाव, देऊळगाव, बोदरा, खांबी, चाप्टी, चान्ना, सावरटोला, अरततोंडी, ब्राह्मणटोला, सुकळी, पिंपळगाव या गावांमध्ये शंकरपटाची परंपरा होती. ती आता पुनरूज्जिवित होऊ शकते.
शासनाने काही अटीच्या आधारे शंकरपटाला दिलेल्या परवानगीमुळे शंकरपट शौकीनामध्ये फारच उत्साह संचारला आहे. पटावर बंदी घातल्यानंतर पटाचे शौकीन निरउत्साही झाले होते. त्यांची बैलांकडे पाहण्याची दृष्टी बदलली होती. चांगले बैल कमी किमतीमध्ये विकण्यातही आले होते. बंदी उठविण्याच्या बातमीमुळे शंकरपट समित्या पुन्हा सक्रीय झाल्या.
शंकरपट हा ग्रामीण भागात परंपरागत असणारा बैलगाडीचा खेळ आहे. या शंकरपटासाठी बैलांची चांगली दाखल घेतली जाते. त्यांना चांगले खाऊ घालणे, खाण्यामध्ये ढेप, दूध, हिरवा चारा असे पौष्टीक पदार्थ देवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. परंतु शंकरपट बंद असल्यामुळे चांगल्या दर्जाचे बैल सुद्धा पहायला मिळत नव्हते. शंकरपटाला काही अटींवर मिळालेल्या परवानगीमुळे बैलांची विक्री बंद होऊन त्यांनाही चांगले दिवस पहायला मिळणार आहेत.
शंकरपटामुळे सडक अर्जुनी तालुक्यात लाखोंची उलाढाल होणार आहे. सडक अर्जुनीत होणारा शंकरपट फार मोठा असून छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यातील बैलजोड्या येथे येत होत्या. महाराष्ट्रातील अमरावती, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यातील पटशौकीन आपल्या बैलजोड्यासह येथे येत होते. लाखोंच्या बक्षिसांसोबत पट पहायला येणाऱ्या नागरिकांकडून हजारोंच्या शर्यती लावल्या जात. शंकरपटामुळे गावात जत्रेचे रुप बघायला मिळत होते. गेल्या काही वर्षात हे चित्र बदलले असले तरी आता पुन्हा ते चित्र दिसण्याची आशा सर्वांना लागली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातही काही गावे शंकरपटासाठी प्रसिद्ध होती. मकरसंक्रात आटोपल्यानंतर शंकरपटाला सुरुवात होते. गावातील प्रतिष्ठीत पाटलाच्या नावाने शंकरपट ओळखले जायचे. प्रत्येक खेळात जसे प्रसिद्ध खेळाडू असतात तसेच बैलांनाही विशेष नावे दिली जात होती. अशा बैलजोडींच्या किमतीसुद्धा भरपूर असायच्या. बैलांना थकवा येऊ नये यासाठी या बैलांना चारचाकी वाहनाने आणण्याची परंपरा अलिकडच्या काळात सुरू झाली होती.
गेल्या तीन वर्षांपासून शंकरपटावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे या उत्साहावर विरजण पडले होते. मात्र आता बंदी उठविण्यात आल्यामुळे ग्रामीण जनतेतील आनंद द्विगुणीत झाला आहे. मोठ्या शंकरपटांसह छोट्या प्रमाणात काही गावांमध्ये शंकरपट भरविले जाणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
करमणुकीसह लाखोंची बक्षिसे व पैज
ग्रामीण भागात शंकरपटाची पूर्वापार परंपरा चालत आली आहे. रबी पीक निघाल्यानंतर थोडे ‘रिलॅक्स’ होण्यासाठी शेतकरी व शंकरपटप्रेमी आपल्या गावात पटांचे आयोजन करीत असत. यादरम्यान शेतकऱ्यांजवळ पीक विक्रीतून मुबकल पैसा यायचा. शंकरपटात बैलाच्या वेगवान गतीवर पैज लागायची. यात लाखो रुपयांची उलाढाल व्हायची. धावणाऱ्या बैलांना धष्टपुष्ट करण्यासाठी शेतकरी वर्षभर मेहनत घेत असत.
विवाह जोडप्याचे शंकरपट हे उत्तम माध्यम होते. ग्रामीण भागातील मंडईला जोडून या ठेवल्या जाणाऱ्या या शंकरपटात उपवर वर-वधूंची आवर्जुन उपस्थिती असायची. लग्न जोडण्याच्या आधीचा हा काळ असल्याने शंकरपटाला विशेष महत्व होते. येथूनच विवाह जुळायचे.
शंकरपट म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांना जोडणारा कणा आहे. पहिल्या दिवशी शंकरपट, रात्रीला झाडीपट्टीतील नाटक आणि दुसऱ्या दिवशी यानिमित्ताने आलेल्या पाहुण्यांचा पाहुणकार व त्यातूनच होणाऱ्या लग्नाच्या गोष्टी हे वातावरण अलिकडे लोप पावत होते. पण पटावरील बंदी उठविल्यामुळे पुन्हा ही परंपरा पुनरूज्जिवित होईल, अशी आशा आहे.
- अशोक लंजे
माजी कृषी सभापती, जि.प.गोंदिया