तिला सुखरूप केले कुटुंबीयांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:25 PM2019-05-06T22:25:04+5:302019-05-06T22:25:22+5:30
आमगाव येथील रेल्वे स्थानकावर घाबरलेल्या स्थितीत एकटीच बसून असलेल्या मुलीची चौकशी करून तिची समजूत घालून स्त्री स्क्वॉडने सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. स्त्री स्क्वॉडच्या या कार्याने या स्क्वॉडच्या निर्मितीमागचा उद्देश खऱ्या अर्थाने फलितास आल्याचे दिसले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमगाव येथील रेल्वे स्थानकावर घाबरलेल्या स्थितीत एकटीच बसून असलेल्या मुलीची चौकशी करून तिची समजूत घालून स्त्री स्क्वॉडने सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. स्त्री स्क्वॉडच्या या कार्याने या स्क्वॉडच्या निर्मितीमागचा उद्देश खऱ्या अर्थाने फलितास आल्याचे दिसले.
पोलिस अधीक्षक विनीता शाहू यांच्या संकल्पनेतून तरुणी, महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्त्री स्क्वॉडची स्थापना करण्यात आली.
जिल्हाभरासाठी दोन पथक तयार करण्यात आले आहेत. रविवारी (दि.५) ग्रामीण भागातील पथक क्रमांक- २ आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगवर असताना त्यांना आमगाव रेल्वे स्थानकावर एक अल्पवयीन मुलगी कपड्यांची बॅग घेवून घाबरलेल्या स्थितीत एकटीच बसलेली दिसली.
तिच्याजवळ कुणीही व्यक्ती न दिसल्यामुळे स्क्वॉडमधील महिला कर्मचाऱ्यांनी तिची आपुलकीने विचारपूस केली. यावर तिने आईसोबत किरकोळ भांडण झाल्याने आपण घरातून बाहेर पडलो असे सांगत गोंदिया येथील सूर्याटोला परिसरात राहत असल्याचे सांगीतले.
यावर स्त्री स्क्वॉडच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांनी तिच्या आई-वडिलांशी संपर्क साधून त्यांना बोलवले व त्यांची समजूत घालून मुलीला सुखरूप त्यांच्या स्वाधीन केले.