दिव्यांगांना सन्मान मिळावा म्हणून ती होणार जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:36+5:30
गोंदिया तालुक्याच्या आंभोरा येथील किरणकुमार व तुतेश्वरी बिसेन यांची धाकटी कन्या म्हणजे ईशा ही बिसेन कुटुंबियांची अभिमानाचा बिंदू आहे. जन्मली तेव्हा ती गोरीपान बाहुली सारखी दिसणारी. परंतु ईशामध्ये कोणते अपंगत्व असेल असे कुणीही विचार केला नव्हता. परंतु ईशा तीन-चार महिन्याची झाल्यानंतर आईच्या लक्षात आले की या बाळाच्या डोळ्यात काहीतरी आहे.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : समाजात दिव्यांगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दुर्बलतेचा आहे. त्यांना बिचारे म्हणून त्यांचा अपमान केला जातो. परंतु जिद्दीने आपल्या शारीरिक समस्येंवर मात करण्यासाठी ईशा किरणकुमार बिसेन हिने चक्क जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. मागील सत्रात शालांत परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये ९२.४० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला होता. तिला भेटल्यावर प्रथमत: कुणालाच तिच्यात दिव्यांगत्व जाणवत नाही.चष्मा असल्याने कळतही नाही. पण अल्पदृष्टी आणि रांगांध असलेली ईशा आपले दिव्यांगत्व स्विकारून उत्कृष्ट, समृध्द, यशस्वी जीवन जगण्याच्या तयारीला लागली आहे.
गोंदिया तालुक्याच्या आंभोरा येथील किरणकुमार व तुतेश्वरी बिसेन यांची धाकटी कन्या म्हणजे ईशा ही बिसेन कुटुंबियांची अभिमानाचा बिंदू आहे. जन्मली तेव्हा ती गोरीपान बाहुली सारखी दिसणारी. परंतु ईशामध्ये कोणते अपंगत्व असेल असे कुणीही विचार केला नव्हता. परंतु ईशा तीन-चार महिन्याची झाल्यानंतर आईच्या लक्षात आले की या बाळाच्या डोळ्यात काहीतरी आहे. कारण तिचे बुबुळे स्थिर राहायचे नाहीत.सतत हलत असायचे. डॉक्टरांनी सांगितले की याबाबत कोणताही उपचार उपलब्ध नाही. आपण एक आॅपरेशन करून बघू पण मी ठीक होण्याचे आश्वासन देऊ शकत नाही. त्यापेक्षा मोठी होईपर्यंत वाट बघू असे सांगितले. आहे ती स्थिती लक्षात घेऊन ईशाच्या शिक्षणाला सुरूवात झाली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंभोरा येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण करणारी ईशा, जन्मत:च हुशार आहे. कुणी काही सांगावं आणि तीने ते लक्षात ठेवावे. तल्लख बुद्धीची देण असलेली ईशाने नवोदयची परीक्षा सुध्दा उत्तीर्ण केली. पण तिच्या डोळ्याच्या समस्या लक्षात घेऊन पालकांनी तिला तिथे पाठविण्याचे टाळले. ईशा रंगांध तर आहेच पण शिवाय ऊन, जास्त प्रकाश तिच्या डोळ्याला सहन होत नाही. सुरूवातीच्या काळात अंध आहे. त्यामुळे शिकू शकणार नाही तिला विशेष शाळेत घाला असं म्हणून अव्हेलना करणाऱ्या व तिचे पाय मागे ओढणाºया समाजाच्या तोंडावर आपल्या हुशारीने ईशाने चांगलीच चपराक हाणली.बुध्दीची तल्लख तिला काही तरी करून दाखवण्याची जिद्द दाखविते. यातून तिने यशाचे एक एक शिखर पादक्र ांत करण्यास सुरूवात केली आहे. आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धेत भाग घेऊन ती हमखास बक्षीस मिळवते. उत्तम कविता करणारी ईशा पुढे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न बायगत आहे. प्रांजल पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तिची वाटचाल सुरू आहे.
प्रशासकीय सेवेत जावून दिव्यांग विद्यार्थ्यासाठी काम करावे, अशी तिची मनिषा आहे. एखाद्या अवयवात कमतरता असणे हा त्या व्यक्तीचा दोष नसतो. तरी समाजाची अव्हेलना सहन करावी लागते असे स्प्टपणे मत मांडणारी ईशा म्हणते की कितीही समस्या असल्या तरी प्रत्येक समस्येला उत्तर हे असतेच. फक्त त्या समस्येला न घाबरता चिकाटीने ते काम करीत राहिले तर एकदिवस समस्या नक्की सुटतेच.ईशा सध्या नटवरलाल मणिकलाल दलाल महाविद्यालयात ईयत्ता अकराव्या वर्गात शिकत आहे. प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे सुयोग्य नियोजनासह प्रयत्न सुरू आहेत.
अवयवातील कमतरतेमुळे कोणत्याही व्यक्तीला हिनवणे ही बाब समाजाच्या कुबुद्धीचा परिचय देणारी आहे. सर्वसामान्य माणसाप्रमाणेच दिव्यांगाना मानसन्मान मिळाला तर सर्वसामान्य माणसासारखेच ते प्रगती करू शकतील. ईशाने बाळगलेले ध्येय गाठण्यासाठी ती त्या मार्गावर जात आहे.
- डॉ.किरण धांडे,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया.