शहीद स्मारकाचे पालटणार रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 09:18 PM2018-05-13T21:18:37+5:302018-05-13T21:18:37+5:30
शहरातील सुभाष बागेत असलेल्या शहीद स्मारकाची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या स्मारकाची डागडुजी करण्याची आठवण प्रशासनाला ३५ वर्षांनंतर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील सुभाष बागेत असलेल्या शहीद स्मारकाची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या स्मारकाची डागडुजी करण्याची आठवण प्रशासनाला ३५ वर्षांनंतर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र काही का असो ना या निमित्ताने शहीद स्मारकाचे स्वरुप पालटणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणाºया शहिदांच्या स्मृतींना उजाळा मिळावा, त्यांच्या स्मारकाने सदैव इतरांना प्रेरणा मिळत राहावी. यासाठी येथील सुभाष बागेत शहीद स्मारक तयार करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरी. ए.आर.अंतुले यांनी अवघ्या राज्यात शहीद स्मारकांचे बांधकाम करविले होते.
तेव्हा भंडारा जिल्ह्यात केवळ तीनच ठिकाणी शहीद स्मारक तयार करण्यात आले. यात एका स्मारक भंडारा येथे, दुसरा स्मारक शहरातील सुभाष बागेत तर तिसरे स्मारक गोरेगाव तालुक्यातील ग्राम कुऱ्हाडी येथे शहीद जान्या-तिम्या यांच्या स्मृतित तयार करण्यात आले.
सन १९८३ मध्ये बनविण्यात आलेल्या या स्मारकांना आता ३५ वर्षांचा कालावधी होत आहे. शहीदांच्या स्मृतीत बनविण्यात आलेल्या या स्मारकाकडे गेल्या ३५ वर्षांत कुणाचेही लक्ष गेले नाही.
मात्र आता ३५ वर्षांनंतर अचानकच का होईना मात्र स्मारकाच्या दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम होत असल्याने स्मारकांचा कायापालट होणार असल्याचे चित्र आहे. सध्या शहीद स्मारकाला लागून असलेल्या सभागृहाचे छत बदलण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी जुने छत काढण्याचे काम सुरू असून येथे नवे रंगीत छत लावले जाणार असल्याची माहिती आहे. स्मारकाच्या परिसरात सौदंर्यीकरण करण्यात येणार आहे.
त्यामुळे हा परिसर आता बागेत येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधणार आहे. विशेष म्हणजे, सुभाष बागेत असलेल्या स्मारकाचे काम सुरू असून त्याचे रूप पालटणार आहे.
स्मारक परिसराची देखरेख करण्याची गरज
सुभाष बागेत असलेल्या शहीद स्मारक जवळील काही स्तंभांवर शहीदांचे नाव नोंद आहे. तर त्यापासून काही अंतरावर शहीद भगतसिंह यांचा पुतळा स्थापन केला आहे. शहरातील भाजी बाजारात असलेल्या या पुतळ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे हा पुतळा सुभाष बागेत स्थानांतरण करण्यात आले. मात्र येथे देखील तिच स्थिती असल्याने शहीदांच्या पुतळ्याची अहवेलना होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून स्मारक परिसर आणि पुतळ्याची योग्य देखभाल करण्याची गरज आहे.
याची दखल घ्या
गोरेगाव तालु्क्यातील ग्राम कुऱ्हाडी येथे एक स्मारक मात्र आहे. मात्र बऱ्याच वर्षांपासून त्याची सुध्दा दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील स्मारकाच्या दुरूस्तीचे काम होणेही तेवढेच गरजेचे आहे. प्रशासनाने याची दखल घेवून या स्मारकारची सुध्दा डागडूजी करण्याची मागणी होत आहे.
शौचालयांचे बांधकाम होणार
सुभाष बागेत सध्या शौचालयाची सोय नसल्यामुळे बागेत येणाऱ्या नागरिकांची असुविधा होते. यात महिलांची अधिक कुचंबना होते. त्यामुळे बागेत महिला-पुरूषांसाठी स्वतंत्र शौचालय बनविण्याची मागणी मागील कित्येक वर्षांपासून केली जात आहे. याची दखल घेत नगर परिषद शौचालयांचे बांधकाम करणार आहे.