शिंदे-फडणवीस सरकारने बोनसच्या नावावर केली शेतकऱ्यांची फसवणूक - प्रफुल्ल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 03:19 PM2023-01-21T15:19:19+5:302023-01-21T15:25:32+5:30

पत्रकार परिषदेत केला आरोप

Shinde-Fadnavis government fooled farmers in the name of bonus says NCP Praful Patel | शिंदे-फडणवीस सरकारने बोनसच्या नावावर केली शेतकऱ्यांची फसवणूक - प्रफुल्ल पटेल

शिंदे-फडणवीस सरकारने बोनसच्या नावावर केली शेतकऱ्यांची फसवणूक - प्रफुल्ल पटेल

Next

गोंदिया : शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य उद्देश आहे. गोंदिया-भंडारा हे दोन्ही जिल्हे धान उत्पादक असून यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस मिळवून दिला. मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळाला. मात्र राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३७५ रुपये बोनस देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप खा. प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारीे (दि. २०) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेला माजी आ. राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, माजी नगराध्यक्ष दामोदर अग्रवाल, वीरेंद्र जायस्वाल उपस्थित होते. खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांच्या विषयावर राजकारण न करता त्यांचे हित कसे साधले जाईल याचा विचार करावा. बोनस जाहीर करताना आजूबाजूच्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असून शेती करणे तोट्याचा सौदा होत आहे. अशात बोनसमुळे शेतकऱ्यांना मदत होत होती. पण हेक्टरी बोनस जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांचा हिरमोड केल्याचा आरोप पटेल यांनी केला.

रेल्वेत गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे महत्त्व

हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे. सर्वाधिक मालवाहतूकसुद्धा याच मार्गावरून होते. रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देणारा हा मार्ग आहे. आपल्या कार्यकाळात रेल्वेचे जाळे या दोन्ही जिल्ह्यांत विस्तारण्यास आणि अनेक गाड्यांना थांबा मिळण्यास मदत झाली. रेल्वे गाड्यांच्या सध्याच्या लेटलतीफ कारभारासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खा. पटेल यांनी सांगितले.

Web Title: Shinde-Fadnavis government fooled farmers in the name of bonus says NCP Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.