आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 06:01 PM2022-06-27T18:01:39+5:302022-06-27T18:08:06+5:30
आमदार विनोद अग्रवाल यांच्या गोंदिया येथील जनसंपर्क कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक व तोडफोड केली. ही घटना आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
गोंदिया : महाराष्ट्राचे राजकारण तापले असताना येथील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयावर शिवसैनिकांनी कार्यालयावर हल्ला करत आपला आक्रोश व्यक्त केला. ही घटना सोमवारी (दि.२७) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे व गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हजर झाले. त्यांनी चौकशी करून या दगडफेक हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध चमू आरोपींच्या शोधासाठी रवाना झाल्या. वेळीच पोलिसांच्या दंगा नियंत्रण पथक दाखल झाले. हल्ला करणाऱ्याचे नाव पुढे आले नसले तरी लवकरच त्यांना जेरबंद करणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
गोंदिया शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात आ. विनोद अग्रवाल यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयावर शिवसेनेच्या ५ ते ७ कार्यकर्त्यांनी लाठीकाठीने हल्ला केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचे वृत्त शहर व परिसरात पसरताच आ. अग्रवाल यांचे समर्थक व जनता की पार्टी चाबी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कार्यालय गाठून घटनेचा तीव्र निषेध केला तसेच शहर पोलीस ठाण्यात जावून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळामुळे व आ. विनोद अग्रवाल यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसैनिकांनी काठीने कार्यालयावर हल्ला केल्याची चर्चा होती.
पाण्याचे कॅन रस्त्यावर फेकल्या
आ. विनोद अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयावर शिवसैनिकांनी हातमोजे परिधान करून हल्ला केला. यावेळी कार्यालयात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यासह झालेल्या वादात त्यांनी कार्यालयाबाहेर ठेवलेल्या पाण्याच्या कॅन रस्त्यावर रस्त्यावर फेकल्या.
मुख्य आरोपीची ओळख?
आ. विनाेद अग्रवाल यांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या आरोपीपैकी मुख्य आरोपीची ओळख पटलेली आहे. त्याच्यासोबत पाच ते सात आरोपी होते. आ. अग्रवाल यांच्या कार्यालयाचे प्रमुख किशोर कटरे यांनी तक्रार केली आहे.
राज्यात अलर्ट पण गोंदियात नियोजन नाही
महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असताना अख्या महाराष्ट्रात पोलिसांना अलर्ट देण्यात आला. परंतु गोंदिया पोलिसांनी या अलर्टला योग्य पद्धतीने हाताळले नसल्याची चर्चा आहे.
शिवसैनिकांची दादागिरी, गुंडगिरी खपवून घेणार नाही
कुठलेही कारण वा वाद नसताना शिवसैनिकांनी माझ्या जनसंपर्क कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली ही घटना अत्यंत निंदनीय आहे. शिवसैनिकांची ही गुंडगिरी आणि दादागिरी यापुढे मुळीच खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकाराचे भ्याड हल्ले करून शहरातील आणि जिल्ह्यातील वातावरण कलुषित करण्याचे काम केले जात आहे. मात्र, यापुढे असा प्रकार मुळीच खपवून घेतला जाणार नाही वेळ पडल्यास आम्हाला जशाच तशी भूमिका घ्यावी लागेल.
- विनोद अग्रवाल, आमदार, गोंदिया