भाजपच्या प्रचारपत्रकावर शिवसेना सहप्रमुखांचे छायाचित्र, एकच गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 12:52 PM2022-01-13T12:52:31+5:302022-01-13T12:58:42+5:30
सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक रिंगणात असताना भाजपच्या वतीने मात्र शिवसेनेचे सहसपंर्क प्रमुख मुकेश शिवहरे यांच्या छायाचित्राचा वापर आपल्या प्रचार साहित्यावर वापरण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेच्या उर्वरित ३० जागांसाठी येत्या १८ जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर धरू लागला आहे. त्यातच सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांसाठी कंबर कसलेली असताना व सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक रिंगणात असताना भाजपच्या वतीने मात्र शिवसेनेचे सहसपंर्क प्रमुख मुकेश शिवहरे यांच्या छायाचित्राचा वापर आपल्या प्रचार साहित्यावर वापरण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
या प्रकारामुळे भारतीय जनता पक्षाला शिवसेनेच्या चेहऱ्याची गरज आहे असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या ओबीसी गटातील सर्वसाधारण झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती जागासाठी सध्या प्रचार सुरू आहे.
दवनीवाडा मंडळाचे भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष पप्पू अटरे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पत्रकामध्ये भाजप नेत्यांसोबतच शिवसेना सहसंपर्कप्रमुख मुकेश शिवहरे यांचे छायाचित्रसुद्धा प्रकाशित करण्यात आले आहे. ते सुद्धा माजी आमदार खोमेश्वर रहागंडाले व भजनदास वैद्य यांच्या आधी व भाजपचे संघटनमंत्री वीरेंद्र अंजनकर यांच्यानंतर त्यांचे छायाचित्र पत्रकावर प्रकाशित करण्यात आल्याने शिवहरेंची भाजपला या निवडणुकीत गरज भासली का अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
तुझं माझं जमेना तुझ्याविना करमेना
बुधवारी (दि.१२) रतनारा जिल्हा परिषद गटातील डोंगरगाव व रतनारा पंचायत समितीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या पत्रकावर शिवहरेंचे छायाचित्र वापरले गेल्याने शिवसेनेतही खळबळ माजली आहे. दरम्यान, भाजपकडून अनवधनाने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. मात्र काही का असेना भाजपला शिवसेने वाचून कमरेना अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.