प्रतापगडावर फुलणार शिवभक्तांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:00:49+5:30
गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड हे हिंदू-मुस्लीम जनतेचे ऐक्याचे प्रतीक आहे. या पवित्र स्थानाला ऐतिहासिक महत्व सुद्धा प्राप्त झाले आहे. हिंदू भाविक हे भोलेनाथाचे तर मुस्लिम बांधव हजरत ख्वाजा उस्मान गणि हारु नी यांचे दर्शन घेतात. एकाच वेळी हिंदू व मुस्लीम भाविक येत असल्याने येथे दरवर्षी मोठया प्रमाणावर गर्दी होत असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : नवसाला पावणारा भोलेशंकर अशी सर्वदूर ख्याती असलेल्या पूर्व विदर्भातील प्रतापगड येथे शुक्र वारी (दि.२१) भक्तांची अलोट गर्दी होणार आहे. सुमारे पाच लक्ष भाविक दर्शन घेण्याची शक्यता वर्तिवली जात आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून तसेच लगतच्या राज्यातून येथे भाविकांची येण्यास गुरुवारपासूनच सुरु वात झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड हे हिंदू-मुस्लीम जनतेचे ऐक्याचे प्रतीक आहे. या पवित्र स्थानाला ऐतिहासिक महत्व सुद्धा प्राप्त झाले आहे. हिंदू भाविक हे भोलेनाथाचे तर मुस्लिम बांधव हजरत ख्वाजा उस्मान गणि हारु नी यांचे दर्शन घेतात. एकाच वेळी हिंदू व मुस्लीम भाविक येत असल्याने येथे दरवर्षी मोठया प्रमाणावर गर्दी होत असते. मनोहरभाई पटेल अकॅडमीच्यावतीने खासदार प्रफुल्ल पटेल तर नाना पटोले मित्र परिवारच्यावतीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ही राजकीय पक्षांची नेतेमंडळी सुद्धा हजेरी लावून यात्रेकरूंना महाप्रसादाचे वितरण करतात.
प्रतापगड या ऐतिहासिक व पवित्र स्थानाला सन २००१ मध्ये पर्यटनाचा दर्जा मिळाला. सन २००३ मध्ये बुटाई रिठीच्या पहाडावर शंकराची एक भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली होती. खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच प्रतापगडला अधिक महत्व प्राप्त झाले होते. २५ जुलै २०१९ रोजी ही मूर्ती खंडित झाली होती व अखेर नाना पटोले मित्रपरिवारने स्वखर्चातून त्याच ठिकाणी १९ फेब्रुवारी रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. नवीन मूर्ती २१ फुटाची असून तिला बघण्यासाठी यावर्षी शिवभक्तांची अधिक गर्दी उसळणार असा अंदाज वर्तविला जात आहे. ना. पटोले यांनी नुकत्याच पार पडलेल्या यात्रा आढावा सभेत प्रतापगडच्या कायमस्वरूपी विकासासाठी इको टुरिझम सिर्कटची संकल्पना पुढे आणली. प्रत्येक विभागाने विकासाचा आराखडा तयार करावा. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी तो आराखडा शासनास सादर करावा. पुढील वर्षी यात्रेच्या किमान ६ महिन्यांपूर्वी नियोजनाचा आढावा घ्यावा असे निर्देश जिल्हाधिकाºयांना दिले.
हजरत ख्वाजा उस्मान गणी हरूनी यांच्या दरग्यावर शनिवारी (दि.२२) सकाळी ७ वाजता ध्वजारोहण व कुराण पठण होणार आहे. दुपारी ३ वाजता शाही संदल काढण्यात येणार आहे. रविवारी (दि.२३) रात्री ९ वाजता वसीम साबरी कव्वाल दिल्ली व गुजरातच्या अहमदाबाद येथील फरिद सोला यांची दुय्यम कव्वाली होणार आहे. सोमवारी (दि.२४) फतीहा खानी होणार असून महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.
अशी सुरू आहे तयारी
पॉलिथिन व तंबाखूमुक्त (पर्यावरण पूरक) यात्रा साजरी करण्यासाठी प्रतापगड ग्रामपंचायततर्फे आवाहन व पत्रक ठिकठिकाणी लावले आहेत. ‘शौचालय बनवा- शौचालयाचा वापर’ करा असा संदेश देणारी फलके गावात लावण्यात आली आहेत. यात्रास्थळी घाण होऊ नये म्हणून २० कचराकुंड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य प्रशासनातर्फे सहा आरोग्य शिबिर व सहा रूग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने गरोदर व स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. गडावरील शिव मंदिराजवळ एक भरारी पथक नेमण्यात आले आहे. व्यावसायिकांनी गढूळ पाणी वापरल्यास ५०० रु पये दंड आकारणी केली जाणार आहे.
प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर नजर
यात्रेत प्लास्टिक पिशव्यांचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. पाणी टंचाई भासू नये यासाठी ५ दिवस पाण्याचे टँकर उपलब्ध राहणार असून पाण्याची आरोग्य विभागातर्फे तपासणी केली जाणार आहे. साकोली, गोंदिया, तिरोडा, पवनी व भंडारा आगारातून एसटी बसेसची सुविधा असणार आहे. २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान इटियाडोह प्रकल्पातून ५० ते १०० क्युसेक पाणी कालव्याद्वारे सोडले जाणार आहे. यात्रेच्या ठिकाणी १५ जागांवर तात्पुरते मुत्रीघर तयार करण्यात आले आहेत. पंचायत समितीच्या ५४ कर्मचाऱ्यांची यात्रेच्या सुविधेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरणासाठी ३५० किलो ब्लिचिंग पावडर व १०० पथदिव्यांची ग्रामपंचायतच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे. महसूल विभागाच्यावतीने मुख्य मंदिर, न्हाणी, गावातील शिवमंदिर, दरगा व पहिली पायरी अशा पाच ठिकाणी सीसीटीव्ही व मोठे स्क्र ीन लावले जाणार आहेत.