शिवेनची आत्महत्या नाहीच
By admin | Published: March 3, 2017 01:21 AM2017-03-03T01:21:24+5:302017-03-03T01:21:24+5:30
चार दिवसांपूर्वी रेल्वेच्या ट्रॅकवर मृतदेह आढळलेल्या शिवेन बिसेन या दहावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या नसून
पोलीस कारवाई संशयास्पद : चौकशीची पालक व पोवार समाजाची मागणी
गोंदिया : चार दिवसांपूर्वी रेल्वेच्या ट्रॅकवर मृतदेह आढळलेल्या शिवेन बिसेन या दहावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या नसून घातपातच झाला असण्याची शक्यता शिवेनच्या आई-वडिलांनी व्यक्त केली. आमचा मुलगा गेला, मात्र अशी घटना अन्य कुणासोबतही घडू नये यासाठी पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मृत शिवेन बिसेनचे वडील अनिल बिसेन यांनी केली आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात गुरूवारी (दि.२) पत्रकारांसोबत ते बोलत होते. याप्रसंगी पोवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष डॉ. कैलाश हरिणखेडे, प्रगतीशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश चव्हाण, पोवार समाजाचे कार्यकर्ते दुर्गेश रहांगडाले, शिवेनची आई शालिनी बिसेन यांच्यासह अन्य समाजबांधव उपस्थित होते. पुढे बोलताना अनिल व शालीनी बिसेन यांनी सांगितले, मुलांच्या अभ्यासासाठी आम्ही गोंदियात राहतो. घरी पैशांची तंगी किंवा अन्य चिंता शिवेनला नव्हती. शिवेन अभ्यासात हुशार होता व त्याला नेव्हीत जाण्याची इच्छा होती. तो शाळेत व ट्यूशनला जात होता व त्याला कोणत्याच प्रकारचे टेंशन नव्हते. अशात त्याने आत्महत्या करणे शक्य नसल्याचे सांगीतले.
दुर्गेश रहांगडाले यांनी, शिवेनच्या प्रकरणात आत्महत्या सांगहीतली जात असून त्याचे परिवार व सामाजाकडून खंडन केले. तर पोलिसांनी प्रकरणात योग्य ती कारवाई केली नाही. पोलिसांची कारवाई संतोषजनक नसल्याचाही आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे शिवेनचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला असताना त्यांचे मुंडके व शरीर जवळच होते. शिवाय शरीरावर कोणत्याही खुणा नव्हत्या व पायात स्लीपर घातलेली होती. रेल्वेने चिरडल्यानंतर अशा स्थितीत मृतदेह मिळने ही बाब संशयास्पद असल्याचेही त्यांनी सांगीतले.
विशेष म्हणजे, शिवेनचा मृत्यू झाला असताना फेसबूकवर कुणीतरी ‘ठेंग्यांचे’ चिन्ह टाकत असल्याची माहितीही याप्रसंगी पत्रकारांना देण्यात आली. शिवाय प्रकरण गंभीर असताना या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षकांकडून नव्हे तर बीट जमादाराकडून केला जात असल्याचेही समाजबांधवांनी यावेळी पत्रकारांना सांगीतले. करिता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी यावेळी मृत शिवेनचे आई-वडील व समाजबांधवांनी केली. (शहर प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
शिवेन आत्महत्या करणार नाही व मृतदेहाची स्थिती बघताही ही बाब स्पष्ट होत असल्याने मृत शिवेनच्या आई-वडीलांनी पोवार समाजाकडे धाव घेतली. यावेळी समाज त्यांच्या सोबतीला आला व शिवेनच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पोवार प्रगतीशील मंचने उचलून धरली. यासाठी पोवार समाजाकडून बुधवारी (दि.१) पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.