शिवशाही फिटनेसमध्ये अडली, लालपरीला मागणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 05:00 AM2022-05-22T05:00:00+5:302022-05-22T05:00:02+5:30
जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा असे दोन आगार असून, फक्त गोंदिया आगारालाच ४ शिवशाही देण्यात आल्या आहेत. या शिवशाही वातानुकूलित असल्याने, वरातीसाठी नागरिक आरागात बुकिंगसाठी येत असल्याची माहिती आहे. मात्र, शिवशाही उपलब्ध नसल्याने आगाराला नुकसान सहन करावे लागत आहे. आता सुमारे महिना होत असूनही शिवशाही पासिंग होऊन आलेली नाही.
कपिल केकत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे सर्वच कर्मचारी कामावर परतले असून, आगारांचे कामकाज पुन्हा एकदा सुरळीत झाले. विशेष म्हणजे, लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने, आगारांना झालेले नुकसान भरून काढण्याची चांगलीच संधी मिळाली आहे. मात्र, उन्हाळ्यामुळे मागणी असलेली शिवशाही भंडारा येथे आरटीओ फिटनेसमध्ये अडकून पडली आहे, तर दुसरीकडे लालपरीला मागणी नसल्याने गोंदिया आगाराला याचा फटका बसत आहे.
जिल्ह्याचे तापमान ४३-४४ अंशांच्या घरात चालले असूनही लग्नसराईचा जोर काही कमी झालेला दिसत नाही. दिवस निघताच वरातीतील बँड व डीजेचा आवाज कानी पडतो. कोरोनाने २ वर्षे खराब केल्यानंतर, आता यंदा मुहूर्त साधून मोठ्या प्रमाणात कर्तव्य पार पाडले जात आहेत. यामुळेच रखरखता उन्हाळा असूनही लग्नांची संख्या कमी झालेली नाही. यामुळेच वरातीसाठी वाहनांची मागणी जोमात आहे. पूर्वी लग्नाची वरात म्हटली की, एसटीची लाल बस डोळ्यासमोर येत होती.
मात्र, आता बसेसमध्येही नवनवीन मॉडेल्स उपलब्ध असल्याने व त्यातही खासगी ट्रॅव्हल्सकडून दर कमी करता येत असल्याने, आता लग्नाच्या वरातीतून लालपरी गायब झाल्याचे दिसते.
विशेष म्हणजे, जिल्ह्याचे तापमान अंगाची लाहीलाही करीत असल्याने, वरात नेताना वऱ्हाड्यांची सोय बघून वातानुकूलित (एसी) बसेसची मागणी वाढली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडे शिवशाही वातानुकूलित असल्यामुळे सध्या शिवशाहीचीच मागणी आहे. मात्र, शिवशाही सध्या भंडारा येथे आरटीओ पासिंगसाठी गेली आहे.
परिणामी, आगाराला या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नाला मुकावे लागत आहे.
गोंदियात ४ शिवशाही
जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा असे दोन आगार असून, फक्त गोंदिया आगारालाच ४ शिवशाही देण्यात आल्या आहेत. या शिवशाही वातानुकूलित असल्याने, वरातीसाठी नागरिक आरागात बुकिंगसाठी येत असल्याची माहिती आहे. मात्र, शिवशाही उपलब्ध नसल्याने आगाराला नुकसान सहन करावे लागत आहे. आता सुमारे महिना होत असूनही शिवशाही पासिंग होऊन आलेली नाही.
वर्षभरात लग्नाचे फक्त १ बुकिंग
- ऑक्टोबरपासून महामंडळातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते व त्यामुळे दिवाळीचा हंगाम आगाराच्या हातून गेला. त्यानंतर, उच्च न्यायालयाच्या आदेशाने २२ एप्रिल रोजी कर्मचारी कामावर परतले व आगाराचे कामकाज सुरळीत होऊ लागले. मात्र, आता शिवशाही नसल्याने नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे लालपरीला मागणी नसून यंदा लालपरीने फक्त फेब्रुवारी महिन्यात लग्नाचे १ बुकींग केल्याची माहिती आहे.