शिवथाळी तासभरातच होतोय फूर्र....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:00 AM2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:27+5:30
महाविकास आघाडी सरकारने केंद्रावरुन १० रुपयात शिवथाळी उपलब्ध करुन दिली आहे. शिवथाळीच्या मेनूमध्ये दोन चपाती, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम डाळ, १५० ग्रॅम भात आदीचा समावेश आहे. शिवथाळीमध्ये दररोज वेगवेगळी भाजी दिली जाते. शासनाने प्रत्येक केंद्राला १०० थाळींची मर्यादा घातली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने २६ जानेवारीपासून राज्यातील काही शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर १० रुपयांत शिवथाळी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत गोंदिया शहरात सुध्दा दोन केंद्र मंजूर करण्यात आले आहे. मात्र यासाठी शासनाने केंद्रांना केवळ शंभर थाळींची मर्यादा घातली आहे. त्यामुळे शिवथाळी तासाभरात संपत असल्याने अनेकांना आल्या पावलीच परत जावे लागत असल्याचे चित्र आहे.शिवथाळीचा सर्वाधिक उपयोग करुन घेणाऱ्यांमध्ये विद्यार्थी आणि प्रवाशांचा समावेश आहे. मात्र त्यांना सुध्दा शंभर थाळीच्या मर्यादेचा फटका बसत आहे.
गोंदिया शहरात जयस्तंभ चौक आणि रेल्वे स्टेशन परिसरात शिवथाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास लोकप्रतिनिधीने रेल्वे स्थानक परिसरातील माँ शारदा रेस्टारेंटजवळील शिवभोजन केंद्राला भेट दिली असता या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी आढळली. शिवभोजन थाळीचा आस्वाद घेत असलेल्या रायपूर येथील रहिवासी ललित देवांगन, राजकुमार राव, मधू देवांगण, राजनांदगाव येथील तीरथ देवांगन, काटी रहिवासी अनूप असाटी, दीनदयाल बिसेन, चैतन्य हेमने यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी शिवथाळीचे कौतुक केले. हॉटेलात १० रुपयात केवळ एक समोसा मिळतो, मात्र शासनाच्या योजनेमुळे १० रुपयात स्वादिष्ट भोजन मिळत असल्याचे सांगून या उपक्रमाचे कौतुक केले. तर राजकुमार राव म्हणाले आधी ६० रुपयात नास्ता करीत होतो. मात्र आता १० रुपयात रुचकर जेवन मिळत असल्याने अनेकांना शिवथाळीची मदत होत आहे. तर ललीत देवांगन म्हणाले आपण गोंदियावरुन बालघाट येथे परिवारसोबत जात होतो. शिवथाळी केंद्रात १० रुपयात जेवन मिळत असल्याची माहिती मला मिळाली आणि या केंद्रावर परिवारासह येऊन आपण शिवथाळीचा आस्वाद घेतल्याचे सांगितले. प्रवाशी आणि विद्यार्थ्यांसाठी खरोखरच या केंद्राची मदत होत असल्याचे सांगितले. शिवथाळी केंद्रावर येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या केंद्रांना दुपारी १२ ते २ या कालावधी ही सुविधा मिळणार असून केवळ १०० थाळींची मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे तासभरात १०० थाळींची संख्या पूर्ण होत असल्याने अनेकांना शिवथाळीचा आस्वाद न घेताच परत जावे लागत असल्याने त्यांची निराशा होत आहे.
दोन्ही केंद्रावर होते गर्दी
शहरातील जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीजवळील प्रताप कॅन्टीन आणि रेलटोली परिसरातील शारदा रेस्टारेंटमध्ये शिवथाळी केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकमत प्रतिनिधीने शुक्रवारी या दोन्ही केंद्रांना भेट दिली असता दुपारी १.१५ वाजताच दोन्ही केंद्रावरील शिवथाळी संपली होती. शिवथाळी केंद्रावरील गर्दी विचारात घेता थाळींची मर्यादा शासनाने वाढवून द्यावी अशी मागणी काही नागरिकांनी केली.
हा आहे शिवथाळीचा मेनू
महाविकास आघाडी सरकारने केंद्रावरुन १० रुपयात शिवथाळी उपलब्ध करुन दिली आहे. शिवथाळीच्या मेनूमध्ये दोन चपाती, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम डाळ, १५० ग्रॅम भात आदीचा समावेश आहे. शिवथाळीमध्ये दररोज वेगवेगळी भाजी दिली जाते. शासनाने प्रत्येक केंद्राला १०० थाळींची मर्यादा घातली आहे. त्यामुळे शिवथाळीचा आस्वाद घेणाऱ्या शंभर ग्राहकांचे फोटो मोबाईलवर घेऊन ते शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड केले जात असल्याचे केंद्र संचालकांनी सांगितले. या केंद्रावर जिल्हा प्रशासन आणि शासनाची सुध्दा करडी नजर असून अधिकारी नियमित भेट देऊन माहिती घेत असतात असे केंद्र संचालक उमंग देवांगन यांनी सांगितले.
शिवथाळी विद्यार्थ्यांसाठी वरदान
शिवथाळी केंद्राचे संचालक योगेश शाहू यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी शिवथाळी वितरीत करण्यासाठी दुपारी १२ ते २ ही वेळ शासनाने निश्चित केली असून शंभर थाळींची मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे दुपारी १ वाजतापर्यंत शिवथाळी संपते. दररोज केंद्रावरुन ७५ ते ८० लोक परत जात असल्याचे सांगितले. यात सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी गोंदिया येथे शिक्षणासाठी भाड्याने खोली घेऊन राहतात. त्यांच्यासाठी शिवथाळी ही वरदान ठरत आहे. मात्र शासनाने केवळ शंभर थाळींची मर्यादा लागू केल्याने त्यांची सुध्दा निराशा होत असल्याचे सांगितले.
इंटरनेटची समस्या
शिवथाळी केंद्रांना शिवथाळीचा आस्वाद घेणाऱ्या ग्राहकांचे फोटो दररोज शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र बीएसएनएलचे नेट नेहमी बंद राहत असल्याने मोठी समस्या येत असल्याचे केंद्र संचालकांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.