३० तासानंतर मिळाला शोभेलालचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:31 PM2018-01-13T23:31:54+5:302018-01-13T23:32:10+5:30

सूर्याटोला येथील तलावात म्हशी धुण्यासाठी गेलेला शेतकरी तलावात बुडाल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मात्र तलावात बुडालेल्या शेतकऱ्याचा शोध शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत लागला नव्हता.

Shobhalal's body was found after 30 hours | ३० तासानंतर मिळाला शोभेलालचा मृतदेह

३० तासानंतर मिळाला शोभेलालचा मृतदेह

Next
ठळक मुद्देएसडीआरफच्या टिमची मदत : सूर्याटोला तलाव परिसरातील घटना, जिल्हा व नगर प्रशासनाची मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सूर्याटोला येथील तलावात म्हशी धुण्यासाठी गेलेला शेतकरी तलावात बुडाल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मात्र तलावात बुडालेल्या शेतकऱ्याचा शोध शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत लागला नव्हता. त्यामुळे शनिवारी (दि.१३) स्थानिक मासेमार आणि बोटीच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली होती. पण यात अपयश आल्याने नागपूर येथील एसडीआरएफच्या टिमला पाचारण करण्यात आले. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बुडालेला शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. यात सुमारे तीस तासांचा कालावधी लागला.
शोभेलाल बघेले (५५) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शोभेलाल व त्यांच्या घराजवळील दोन शेतकरी म्हशी धुण्यासाठी सुर्याटोला तलावावर गेले होते. दरम्यान म्हशी धुत असताना शोभेलालचा तोल गेल्याने ते तलावात बुडाले. काही अंतरावर असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार लक्षात येतातच त्यांनी शोभेलाल ला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना शोभेलाल सापडला नाही. यानंतर त्यांनी याची माहिती पोलीस व गावकऱ्यांना दिली. माहिती मिळताच गावकरी व पोलीसांनी सुर्याटोला तलावाकडे धाव घेत शोध मोहीम सुरू केली. यासाठी स्थानिक मासेमार आणि नगर परिषदेच्या बोटीची मदत घेण्यात आली.
शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत तलावात शोभेलालचा शोध लागला नाही. त्यामुळे शनिवारी (दि.१३) सकाळी ८ वाजतापासून मासेमार व बोटीच्या मदतीने तलावात शोध मोहीम सुरू करण्यात आली. काही महिन्यापूर्वीच या तलावातील गाळाचा उपसा करण्यात आला होता. त्यामुळे शोभेलाल तलावातील चिखलात फसल्याचा अंदाज व्यक्त केला जाता. दरम्यान दुपारी २ वाजेपर्यंत शोभेलालचा मृतदेह न सापडल्याने जिल्हा प्रशासनाने नागपूर येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) टिमला पाचारण केले.
सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एसडीआरएफची टिम घटनास्थळी दाखल झाली. यानंतर त्यांनी तलावात शोध मोहीम सुरू केली. सायंकाळी ६ वाजताच्या शोभेलालचा मृतदेह शोधण्यात या टिमला यश आले. तब्बल तीस तासांच्या शोध मोहीमेनंतर शोभेलालचा मृतदेह हाती लागला.एसडीआरएफच्या टिमने मृतदेह बाहेर काढल्यानंतर शोभेलालच्या कुटुंबीयांचा अश्रृंचा बांध फुटला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांना त्यांना धिर दिला. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
घटनास्थळी नागरिकांची गर्दी
शोभेलालचा मृतदेह शोधण्यासाठी शुक्रवारपासून स्थानिक मासेमार आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुर्याटोला तलावात शोधमोहिम सुरू होती. नगर परिषदेच्या बोटीची मदत घेण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
नगर परिषदेचे सहकार्य
तलावात बुडालेल्या शोभेलालचा मृतदेह शोधण्यासाठी नगर परिषदेने सुध्दा सहकार्य करीत बोट उपलब्ध करुन दिली. नगराध्यक्ष अशोक इंगळे स्वत: बोटीत बसून शोध कार्यात मदत करीत होते. त्यांच्यासोबत नगरसेवक आणि पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते.

Web Title: Shobhalal's body was found after 30 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.