धक्कादायक! ट्रॅव्हल्समध्ये आढळला ८४ किलो तंबाखू
By नरेश रहिले | Published: August 10, 2024 07:57 PM2024-08-10T19:57:51+5:302024-08-10T19:58:07+5:30
एकूण ३० लाख ४५ हजार ९५० रुपयांचा माल जप्त केला.
नरेश रहिले
गोंदिया : शेजारच्या छत्तीसगड राज्यातून तंबाखूची अवैध वाहतूक करताना पोलिसांनी ट्रॅव्हल्सला पकडले. देवरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ५:३० वाजता बसस्थानक येथे ही कारवाई केली आहे. यामध्ये तंबाखू व ट्रॅव्हल्स असा एकूण ३० लाख ४५ हजार ९५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
शेजारच्या छत्तीसगड राज्यातून तंबाखू टाकून ट्रॅव्हल्स क्रमांक (एमएच ४७, वाय २७९४) देवरीत आली होती. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली असता, त्यांनी बसस्थानक येथे ट्रॅव्हल्सवर धाड घातली. पोलिसांना ट्रॅव्हल्समध्ये एक किलो वजनाची सुगंधित रिमझिम तंबाखूची ७९ पाकिटे किंमत ४३ हजार ४५० रुपये तसेच ५०० ग्रॅम वजनाची सुगंधित रिमझिम तंबाखूची १० पाकिटे किंमत दोन हजार ५०० रुपये असा एकूण ४५ हजार ९५० रुपयांचा ८४ किलो तंबाखूचा साठा सापडला.
पोलिसांनी ४५ हजार ९५० रुपयांचा तंबाखू व ३० लाख रुपये किमतीची ट्रॅव्हल्स असा एकूण ३० लाख ४५ हजार ९५० रुपयांचा माल जप्त केला. यातील आरोपी बादुल्ला सादुल्ला खान (४९, रा. घर क्रमांक ११८, अटल आवास, कंचन बाग, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) व शेख इशाक शेख नजीर (४२, रा. वाॅर्ड क्रमांक १३, गौरी नगर, राजनांदगाव, छत्तीसगड) या दोघांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २२३, २७४, २७५, १२३ सहकलम २६२ (आय), २६ (२), (आयव्ही) २७ (३), (इ) ३ (१) (झेड झेड) (व्ही) अन्नसुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी महेश चहांदे, पोलिस निरीक्षक डांगे, सहायक पोलिस निरीक्षक गंगाकचूर, पोलिस नाईक मेश्राम यांनी केली.