धक्कादायक...! स्पिरीट व रसायनाच्या माध्यमातून तयार केली जात होती दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2022 10:28 PM2022-10-04T22:28:34+5:302022-10-04T22:29:22+5:30
गोंदिया तालुक्यातील खातिया येथील सुभाष रामचंद्र पालीवाल हा आपल्या घरात बनावट दारू तयार करून विक्री करीत असल्याची माहिती रावणवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी या माहितीच्या आधारावर खातिया येथे धाड टाकून ३ लाख १३ हजार ८२९ रूपये किमतींची बनावट दारू व बनावट दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खातिया येथील एका कारखान्यावर रावणवाडी पोलिसांनी २ ऑक्टोबरला धाड टाकून मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साठा जप्त केला. तसेच, दारू तयार करण्याचे साहित्य सुद्धा जप्त केले. त्यात दारू तयार करण्यास लागणारे रसायन वापरले जात होते. हे रसायनयुक्त दारू प्यायल्याने लोकांना विषबाधा देखील होऊ शकते. स्पिरीट, अल्कोहोलचे रंग फ्लेवर मिक्स करून बाटलीत भरून बनावट लेबल लावून विक्री करीत असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.
गोंदिया तालुक्यातील खातिया येथील सुभाष रामचंद्र पालीवाल हा आपल्या घरात बनावट दारू तयार करून विक्री करीत असल्याची माहिती रावणवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी या माहितीच्या आधारावर खातिया येथे धाड टाकून ३ लाख १३ हजार ८२९ रूपये किमतींची बनावट दारू व बनावट दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणात आरोपी सुभाषचंद दिनेशचंद पालीवाल ( ४८ ) रा. कुकापूर, ता. बाह, जि. आग्रा ( उत्तर प्रदेश) ह मु. खातीया, ता. जि. गोंदिया, राजेश सुनील यादव (२८) रा. जानकी हॉस्पिटलच्या बाजूला, मरारटोली, संदीप आमोद चंद्रिकापुरे (२३) रा. जुने लक्ष्मीनगर, बुद्ध वाॅर्ड, गोंदिया, तरुण राजेश टेंभुर्णे (२३) रा. जुने लक्ष्मीनगर, चंद्रशेखर वाॅर्ड, गोंदिया व प्रकाश गोवर्धन अग्रवाल (४७) रा. कामठा ग्रामपंचायतजवळ, कामठा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींवर भादंविच्या कलम ३२८ भांदवी सहकलम ६५ (ब) (क)(ड) (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असून ते फरार असल्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी पीसीआर मागण्यात आला. न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे करीत आहेत.
पाच आरोपींचा ७ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर
तालुक्याच्या खातिया येथील सुभाषचंद पालीवाल यांच्या घरात बनावट दारू तयार करून बाजारात विक्री करण्याचा मानस ठेवणाऱ्या त्या बनावट दारूच्या कारखान्यावर रावणवाडी पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी धाड टाकून ३ लाख १३ हजार ८२९ रुपयाचा माल जप्त केला. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने या आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दारू तयार करण्याचे साहित्य केले जप्त
- ३१ बॉक्स मध्ये ३१०० नग टायगर बँड देशी दारु संत्रीचे पव्वे किंमत १ लाख ८ हजार ५०० रुपये, ३६ बाॅक्समध्ये ३६०० नग रॉकेट देशी दारू संत्राचे पव्वे किंमत १ लाख २६ हजार ७ प्लास्टिक बोरीमध्ये ३३६ नग इंपेरीयल ब्ल्यू इंग्रजी दारुचे पव्वे किंमत ५० हजार ४०० रुपये, ३ प्लास्टिक बोरीमध्ये १४४ नग मॅकडॉल नंबर ०१ इंग्रजी दारूचे पव्वे १६० पव्वे किंमत २३ हजार ४० रूपये, एका प्लास्टिक ड्रममध्ये अंदाजे १५ लिटर स्पिरीट, अल्कोहल किंमत २ हजार रुपये, इंपेरीयल ब्ल्यू इंग्रजी दारुचे झाकण खाली प्लास्टिक बॉटल्स टायगर ब्रँड देशी दारू, रॉकेट देशी दारूचे स्टीकर व इतर साहित्य असा एकूण ३ लाख १३ हजार ८२९ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.